संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे मनपा ने प्राणवायू (Oxygen) चा होणारा तुटवडा व मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू (Oxygen) निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय हाती घेतला आहे.
या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत युद्ध पातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत होती. प्राणवायूअभावी रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी पार्किंग प्लाझामधील रूग्णांना ठाणे कोविड रूग्णालयामध्ये स्थलांतंरित करण्याचा निर्णय घेतला गेला होता.
त्यानंतरही ठाणे महापालिकेच्या कोविड रूग्णालयांना तसेच खासगी कोविड रूग्णालयांना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पीएसए तंत्रज्ञानावर आधारीत स्वतःचे दोन प्रकल्प उभे करण्याचा ठाम निर्णय घेतला.
ठाणे महानगरापलिकेच्या ठाणे कोविड रूग्णालय आणि पार्किंग प्लाझा रूग्णालय या ठिकाणी हे दोन प्लांट उभे करण्यात येणार असून एका प्लांटमधून २४ तासामध्ये जवळपास १७५ सिलेंडर्स प्राणवायू (Oxygen) तयार होईल एवढी क्षमता आहे. त्यामुळे दोन प्लांटमधून दिवसाला अंदाजे २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे.
औरंगाबाद स्थित आयरॅाक्स टेक्नॅालॅाजिज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून हे दोन प्लांट उभारण्यात येणार असून यामध्ये प्रेशर स्विंग ॲबसॉर्प्शन (पीएसए) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सदर कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महानगरपालिका, सामान्य रूग्णालय, सिंधुदूर्ग, बीड या शासकीय ठिकाणी असे प्लांट उभे केले आहेत.
या प्लांटमधून २४ तासा मध्ये १७५ सिलेडंर्स प्राणवायू निर्माण करण्यात येणार आहे.सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे कोविड रूग्णालयासाठी २० टन तर पार्किंग प्लाझा रुग्णालयासाठी १३ टन प्राणवायुची आवश्यकता आहे. या दोन प्लांटमुळे या दोन्ही रूग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.