संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
सद्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमाने फसवणुकीचे प्रमाण वाढले असून पोलिस विभागा तर्फे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आरोपिंवर नजर ठेवून कारवाई केली जात आहे.
बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याचे नावाने लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळी बाबत नांदेड जिल्ह्यातील सायबर सेलच्या महिला पोलीस उप निरीक्षक अनिता चव्हाण (सद्या स. पो.नि/ ए. टी. एस. नांदेड ) यांनी काही तक्रारदार यांना ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आले त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर टोळी डोंबिवली, जिल्हा- ठाणे येथे असल्याची माहिती मिळवून पोउनि/नितीन मुदगुन, गुन्हे शाखा, ठाणे युनिट ३, कल्याण यांना संपर्क साधला त्या नंतर गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून केवळ मोबाईल लोकेशन वरून अनेक कमर्शियल कॉम्प्लेक्स असलेल्या परिसरात सुमारे १५ ते २० दिवस पाळत ठेऊन बनावट कॉल सेंटर निश्चित शोधून काढले त्या नंतर इतवारा पो.स्टे. नांदेड येथे फसवणूक झालेल्या तक्रारदार यांची एफ आय आर नोंद केली परंतु त्या दरम्यान लॉक डाउन सुरू झाल्याने नमूद कॉल सेंटर चे कामकाज त्या ठिकाणी बंद करून वेगवेगळ्या लोकेशन वर सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची घाई न करता वारंवार तांत्रिक विश्लेषण सुरू ठेवले.
मागील १० ते १२ दिवसा पूर्वी पुन्हा पूर्वीच्या ठिकाणचे कॉल सेंटर चालु झाल्याने नांदेड येथील पोलीस पथकाला संपर्क करून दिनांक ०९/०६/२०२१ रोजी नांदेड येथील पो उ नि /काळे व पथक तसेच गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याणचे, सपोनि/दायमा, पो उ नि /मुदगुन, पो उ नि /कळमकर व पथक यांनी गुन्हे शाखा, ठाणेचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांचे नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सिटी मॉल पहिला माळा ११६, पेंढारकर कॉलेज जवळ, डोंबिवली या ठिकाणी इतवारा पोलिस ठाणे, नांदेड गुन्हा रजिस्टर नंबर 80/20 भादंवि कलम 420,406 प्रमाणे दाखल गुन्ह्यात बनावट कॉल सेंटरवर संयुक्तपणे छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी आरोपी नामे दिनेश मनोहर चिंचकर, वय- ३१ वर्ष, राहणार- न्यू साईनाथ कॉलनी, रामदास वाडी, कल्याण व रोहित पांडुरंग शेरकर, वय- २८ वर्ष, राहणार- काकाच्या ढाब्याजवळ, कल्याण पूर्व हे १८ ते २० कर्मचारी नोकरीस ठेऊन उत्तर प्रदेश राज्यातील काही साथीदाऱ्यांचे मदतीने बनावट कॉल सेंटर चालवीत असताना मिळून आले आहेत. त्यांनी मोबाईल क्रमांकाचा ऑनलाईन डाटाबेस मिळवून नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त मोबाईल क्रमांकाच्या डाटाबेस मधील क्रमांकावर फोन करण्यास लावून बजाज फायनान्स कंपनीमार्फत लोन मिळवून देतो असे सांगून लोकांना लोन पास करणे करिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून फसवणूक केली आहे.
सदर ठिकाणाहून २६ मोबाईल, एक लॅपटॉप, अनधिकृतरित्या मिळवलेला मोबाईल क्रमांकाचा डाटाबेस, इतर कागदपत्र असे एकूण रुपये १,१०,०००/- कींमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर बनावट कॉल सेंटर स्थापन केलेला इसम व मॅनेजर म्हणून काम पाहणारा इसम यांना अटक करण्यात आली असून सदर ठिकाणी नोकरी करणारे कर्मचारी यांचे कडे अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो.ठाणे शहर, श्री. जय जीत सिंग, मा. पोलीस सह आयुक्त सो. श्री. मेकला, मा. अपर पोलीस आयुक्त सो. श्री. येनपुरे, मा. पोलीस उप आयुक्त सो. श्री. पाटील, मा. पोलीस अधीक्षक सो. श्री. शेवाळे, नांदेड मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो. श्री. कदम यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा, ठाणे घटक -३ कल्याण चे व इतवारा पोलीस ठाणे नांदेड चे पोलीस पथकाने केली.