संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण येथे वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला. तसेच एक पथक आळंदीला रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हा प्रकार कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावातील हद्दीत घडला होता.पाण्याच्या वादातून वृद्धाने आपल्या पत्नीला जाब विचारत बादलीने तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. महिला वारंवार मला मारु नका, अशी विनंती करत होती. मात्र वृद्ध अमानुषपणे मारहाण करत होता. दरम्यान,घरातील कोणीही मध्यस्थी करत मदतीसाठी येत नव्हते, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून दिसत होते. तर वृद्ध महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून, सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्धेला भेटून तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र वृद्धेने पतीच्या विरोधात कुठलीही तक्रार नसल्याचं सांगितलं. अखेर पोलिसांनी सु मोटोने मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपी आळंदीला गेला होता. त्यामुळे एक पथक आळंदीला रवाना केले, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.