
संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी
भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील केशवसृष्टी परिसरात असलेला खाडीवर नावाचे गाव जिथे जवळपास पन्नास पेक्षा जास्त कुटुंब राहातात. हे गाव मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असून देखील गेली अनेक वर्षे ह्या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून आजही ह्या गावचे नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत.
वर्ष २०१७ साली येथील स्थानिक नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी प्रयत्न करून या गावाला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी एक १० हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधली होती. या टाकीमध्ये महानगरपालिकेच्या टँकर द्वारे आठवड्यातून तीन वेळा पाणी टाकून खाडीवर या गावाच्या नागरिकांना पाणी पुरवठा केला जात होता.
वर्ष २०१९ साली टँकर मुक्त मिरा भाईंदर या योजनेमुळे या गावाचा टँकर द्वारे केला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी प्रयत्न करून मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकून घेतली परंतु या ठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्यामुळे या गावाला अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे या गावचे नागरिक आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.
महानगरपालिकेचा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे सध्या या गावचे नागरिक नाईलाजाने परिसरातील विहिरी आणि तलाव यांचे दूषित पाणी पिण्यास अवलंबून आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी खाडीवर या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांचेकडे केली असून त्यांच्या मागणीवर महापालिका काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.