संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्रातील सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खाद्यतेल आणि तेल बियांवर कडक कारवाई सुरू आहे. केंद्रीय पथकांनी शुक्रवारी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये खाद्यतेलाशी संबंधित साठेबाजी तपासण्यासाठी छापे टाकले.
देशात अनेक ठिकाणी खाद्यतेल आणि तेल बियांची साठेबाजी होत असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम महागाईवर होत आहे. तत्पूर्वी, महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
कस्टम ड्युटी रद्द करण्याची घोषणा
सरकारने मार्च २०२४ पर्यंत वार्षिक २ दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर कस्टम ड्युटी आणि कृषी पायाभूत सुविधा उपकर रद्द करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतरही स्वयंपाकाचे तेल स्वस्त होईल, अशी अपेक्षा आहे.
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये वार्षिक २० लाख टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर कस्टम ड्युटी लावली जाणार नाही. आयात शुल्कातील ही सूट देशांतर्गत किमती खाली आणेल आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल, असा सरकारचा विश्वास आहे.