संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विस्तार काल संपन्न झाला. काल रात्री खातेवाटप झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी २३ हजार १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजची घोषणा करण्यात आला आहे. याशिवाय एक लाख कोटी रुपये मंडयांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील. कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मनसुख मंडाविया आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी कॅबिनेटमधील निर्णयांची माहिती दिली.
नव्या मंत्रिमंडळाची बैठक संध्याकाळी ५ वाजता बोलावण्यात आली होती. जवळपास तासभर ही बैठक चालली. मंडयांचं सशक्तीकरण करणं हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच १ लाख कोटी रुपये मंडयांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. एपीएमसी मंडया आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी मंडयांना अधिक संसाधनं दिली जातील. मंडया संपवल्या जाणार नाहीत, असं कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले.
कोरोनाचं संकट पाहता आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवनियुक्त आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली जात आहे. २० हजार नवे आयसीयू बेड तयार करण्यात येत आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी २३१०० कोटी रुपयांचं आपत्कालीन हेल्थ पॅकेज तयार करण्यात आलं आहे, असं मंडाविया यांनी सांगितलं.