संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
म्हाळुंगे ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याहस्ते आज करण्यात आलं. त्यावेळी राऊत यांनी पुणे महापालिकेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायला हवा, असा आदेशच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय. राज्यात महाविकास आघाडी आहे. मग महापालिकेवरही महाविकास आघाडी आणायला हवी, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही टोला लगावलाय.
महाराष्ट्रात वेगळा प्रयोग केला आणि तो आदर्श ठरलाय. राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी झाली पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. आम्हाला आता काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा, असा सल्ला संजय राऊत यांनी पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय. महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काहीही हातातून सोडू नका, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या वक्तव्याचा आधार घेतला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला होता. मी पुन्हा येईन. मी दिल्लीत असलो तरी माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईन, प्रचारासाठी पुन्हा येईन, असं संजय राऊत म्हणाले. त्यावेळी उपस्थित लोक खळखळून हसत असल्याचं पाहायला मिळालं.
संजय राऊत कार्यक्रमाला पोहोचले आणि बोलायला उभे राहिले तोपर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमस्थळी आले नाही. त्यावेळी बोलताना राऊतांनी महापौरांना टोला लगावला. महापौर अजून आले नाहीत, त्यांची वाट पाहतोय. महापौरांनी सगळीकडे जायला हवं. महापौरांना वाटतं की राज्य आपल्या हातात आलं आहे. ते त्यांना सोडायचं नाही, अशा शब्दात राऊतांनी मोहोळ यांना टोला हाणला.
पुण्यात आम्ही महाविकास आघाडी बनवू, याबाबत वाटाघाटी करु, एकत्र बसून चर्चा करु, असंही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत आम्ही ८० जागा लढवू शकत नाही का ? असंही राऊत म्हणाले. यापूर्वीही राऊत यांनी आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीनं एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, असं राऊत म्हणाले होते. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.