संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
वाहतुकीचे नियम डावलून ‘नो पार्किंग’ मध्ये उभ्या असलेल्या गाडीला जॅमर लावल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसाला ” थेट वर्दी उतरव, चिरून टाकेन ” व पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मुजोरी करत गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केल्यावर मात्र त्यांची मस्ती जिरून चक्क ढसाढसा रडायला लागले. मीरारोड मध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत.
वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्णत दबडे हे नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाई करत होते. दुपारी अडीचच्या सुमारास मीरारोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ मध्ये मोटारकार उभी केली होती. त्या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्याने त्यांनी जॅमर लावला.
तोच तेथील एका दुकानातून अरुण रतन सिंग (३६) व त्याची पत्नी मीना (३३) रा. साई आंगण, रामदेव पार्क, मीरारोड हे दोघे बाहेर आले. गाडीला जॅमर लावल्याचे पाहून दोघेही पोलिसावर तुटून पडले. वाट्टेल तश्या धमक्या, शिवीगाळ, मुजोरी आणि पैशांची मस्ती दाखवून तमाशा करू लागले.
अरुणने तर “तुझी वर्दी उतरव मग बघा तुला कसा चिरून टाकतो” असे धमकावले. मीनाने तर, तुला विकून गाडी दुरुस्त करेन अशी दमदाटी केली. लोकांची गर्दी जमली पण कोणी पुढे आले नाही. अखेर नया नगरचे पोलीस आल्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दबडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण व मीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रस्त्यावर हिरोगीरी आणि भाईगिरी करणाऱ्या अरुण ला पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात अटक करताच तो ढसाढसा रडू लागला. त्याचा रडतानाचा आणि पोलिसांवर दांडगाई करतानाचा असे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांना गयावया करून दोघेही नवरा-बायको माफी मागून पुन्हा आम्ही असे करणार नाही म्हणून गयावया करीत विनवण्या करत होते.