रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीत पसरली शोककळा!
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करताना त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. त्यांनी १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.
सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. १९४७ च्या ‘जुगनू’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ साली ‘आरती’ चित्रपटात निगेटिव्ह भूमिका शशिकला यांना मिळाली. आरती चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.
‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (२००३) इत्यादी. शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी भारत सरकारनं २००७ साली ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं. २००९ साली त्यांना व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही प्रदान करण्यात आला होता. आजच्या त्यांच्या एक्झिट मुळे संपूर्ण सिनेसृष्टी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे..