भाईंदर – ईडीच्या पीडा सोसल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच मीरा भाईंदर शहरात दिसले. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्या पासून जवळपास गेल्या वर्षभरापासून प्रताप सरनाईक भूमिगत झाल्यासारखे गायब झाले होते.
आज अखेर मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून ‘शिवसंपर्क अभियाना’चा शुभारंभ आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. यावेळी त्यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहरावासियां करिता आपल्या आमदार निधीतून २ कार्डियाक ऍम्ब्युलन्स आणि २ मोक्ष रथ या दोन वाहनांच्या चाव्या महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
१२ जुलै ते २४ जुलै या काळात महाराष्ट्र राज्यात शिवसेनेकडून ‘शिवसंपर्क अभियान’ राबवण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचा शुभारंभ आज मीरा-भाईंदर शहरात झाला असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाचे लोकार्पण भाईंदरमध्ये करण्यात आले. मीरा-भाईंदर शहराला या कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाची सुविधा २४ तास मोफत मिळणार आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेचे मीरा-भाईंदरमधील सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना आमदार प्रताप सरनाईक यांनी कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाच्या चाव्या सुपूर्द केल्या.
कोरोना साथरोगाच्या पहिल्या लाटेच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्न-धान्य आणि आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम आमदार प्रताप सरनाईक यांनी केले होते. अनेक आरोग्य विषयक उपक्रम त्यांच्याकडून सातत्याने राबवले जात होत्या. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कठीण प्रसंगी मात्र सेनेचे आमदार प्रताप सरनाईक शहरात कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार गायब झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या विषयी जी काही माहिती मिळत होती ती प्रसार माध्यमांकडूनच मिळत होती. मात्र आज अनेक दिवसां नंतर आज मीरा भाईंदर शहरात त्यांचे आगमन झाले आणि त्यांच्या आमदार निधीतून २ कार्डियाक ऍम्ब्युलन्स व २ मोक्ष रथ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यासाठी जवळपास १ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या कार्डियाक ऍम्ब्युलन्स अत्याधुनिक असून त्याचा मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे. रुग्णाला घेऊन एखाद्या ठिकाणाहून हॉस्पिटलपर्यंत जाताना कार्डियाक ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजनची सुविधाही असणार आहे. त्यात एक डॉक्टर नर्स यांची बसण्याची सोय, ऑक्सिजन सुविधा व आवश्यक त्या इतर आरोग्य सुविधा आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघात मीरा भाईंदर शहरात ही कार्डियाक ऍम्ब्युलन्स विनामूल्य लोकांना सेवा देणार आहे. त्याचा गरजू रुग्णांना आधार होईल.
मीरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी ‘मोक्ष रथ’
शहरातील एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पार्थिव शरीर तिरडीवर स्मशानभूमीपर्यंत अनेक लोक नेत नाहीत, पार्थिव नेण्यासाठी वाहन उपलब्ध करावे लागते. अनेक वेळा महापालिकेची शववाहिनी उपलब्ध होतेच असे नाही व अनेकदा लोकांची गैरसोय होते. शहरात स्मशानभूमी दूर असल्यास मृताचे नातेवाईक व मित्रपरिवाराला तिथे चालत जाणे शक्य नसते. उन्हाळ्यात पावसाळयात अंत्ययात्रा चालत नेणे शक्य होत नाही. नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तिरडीवर मृतदेह न नेता अंत्ययात्रा वाहनात मृतदेह स्मशानात नेले जातात. त्यामुळे नागरिकांची हि गरज ध्यानात ठेऊन हा अत्याधुनिक ‘मोक्ष रथ’ तयार करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर शहरात मोक्ष रथ २४ तास विनामूल्य सेवा देणार आहे.
त्याचबरोबर अनेकदा एखाद्याचे पार्थिव दूरवर आपल्या गावी अंत्यसंस्कारासाठी न्यायचे असते. त्यासाठी या मोक्ष रथात पार्थिव शरीर ठेवण्यासाठी बर्फ पेटी म्हणजेच ‘शीत शवपेटी’ याचीही सोय करून देण्यात आली आहे. त्याचा गरजेच्या वेळी लोकांना नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेच्या ‘शिवसंपर्क अभियाना’ ची सुरुवात!
शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’ आजपासून सुरू झाले असून हे शिवसंपर्क अभियान १२ जुलै ते २४ जुलै या काळात राबवण्यात येणार आहे. जनतेची अधिकाधिक सेवा व कामे करा, आरोग्य सुविधा लोकांना मिळवून द्या, असे आदेश शिवसेना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मतदारसंघातील नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कटिबद्ध असून आम्ही आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत, आणखी काही उपक्रम लवकरच सुरु करू, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मात्र त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी ईडीची जी चौकशी सुरू आहे त्याबद्दल मात्र त्यांनी काहीही बोलणे टाळले आहे.