संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत ३ लाख लोकांचे लसीकरण..
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमे अंतर्गत ठाणे महापालिकेने आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ लाख लोकांचा उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पार केला.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्या टप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.
यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत असून आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी महापालिकेच्या आनंद नगर येथील आपला दवाखाना येथील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. चारूदत्त शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.
आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर २३,४४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर १४,९५७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी २२,९५१ लाभार्थ्यांना पहिला व ११,५२० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटा अंतर्गत ८१,९५६ लाभार्थ्यांना पहिला तर १०,०९२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील नागरिकांमध्ये १,०४,५७५ लाभार्थ्यांना पहिला डोस व ३०,७४२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शन सुचेननुसार १८ वर्षाखालील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज असून शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात आले.