संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात महापालिकेच्या मोहिमे अंतर्गत लसीकरण केंद्रावर जेव्हा लस उपलब्ध होती त्यावेळी अनेकांनी ती घेतली नाही. मात्र आता अनेक खाजगी, शासकीय व निमशासकीय कार्यालयात लसीकरणाची सक्ती केली जात असल्याने लसीसाठी कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पर्याप्त ‘कोविशिल्ड’ लस उपलब्ध नसल्याने या सर्व कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. टाळेबंदीमध्ये शिथिलता देत शासकीय व निमशासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीसाठी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना लससक्ती केली जात आहे.
शहरात आतापर्यंत एकूण १४ लाख ४७ हजार ९५३ लोकांनी लस घेतली असून त्यात पहिली मात्रा १० लाख २७ हजार २३८ नागरिकांनी तर दुसरी मात्रा ४ लाख २० हजार ७१५ नागरिकांनी घेतली आहे. अठरा वर्षांवरील ४ लाख २५ हजार ९०३ युवकांनी पहिली तर ३६ हजार ६७५ युवकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. याशिवाय ४५ वर्षांवरील २ लाख ९६ हजार ३२४ नागरिकांनी पहिली मात्रा तर १ लाख ८७ हजार ९२८ दुसरी मात्रा घेतली आहे.
परंतु, अजूनही १० लाखांवर नागरिकांनी लस घेतलेली नाही.
शहरात १४२ केंद्र आहेत.
येथे दररोज ३० ते ३५ हजार लसींची आवश्यकता असताना त्या प्रमाणात शहराला पुरवठा होत नाही. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे.
अनेक खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लस घेतल्यावरच कार्यालयात या असे बजावले जात आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी अनेकांची सैरवैर धावाधाव सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘कोविशिल्ड’ लसीकरण बंद आहे.
महापालिका व शासकीय रुग्णालयासह केवळ ९ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जात आहे. मात्र त्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे अनेकांना लस मिळत नाही. ज्यांनी ‘कोविशिल्ड’ची पहिली मात्रा घेतली आहे आणि दुसरी मात्रा हवी आहे, त्यांची लसतुटवडय़ा मुळे मोठीच अडचण झाली आहे.