
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागण्याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यकत्यांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. ठाणे जिल्ह्याचा विचार करता केंद्रीय मंत्रीमंडळात अद्याप पर्यंत जिल्ह्याच्या कोणत्याही नेत्याला स्थान मिळालेले नव्हते. कपील पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे.
ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाचे असलेले राजकीय वर्चस्व आणि दि.बा.पाटील यांच्या नामकरणाचा प्रस्ताव सर्वात आधी खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत मांडला. तसेच आगामी सर्वच निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेनेसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपने आगरी समाजाच्या रूपात भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून निवड केली आहे.
अनेक भाजपा नेत्यांचे खासदार कपिल पाटील निकटवर्ती
विशेष म्हणजे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी खा.कपिल पाटील यांना मंगळवारीच दिल्लीला बोलावून घेतले होते. तेव्हापासूनच भिवंडी मतदारसंघात मंत्रीपदाबद्दल भाजपच्या गोटात चर्चा सुरु झाली होती. खा.कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यातच अल्पावधीतच खा.कपिल पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन केली असल्याने अनेक भाजपा नेत्यांचे खा. कपिल पाटील हे निकटवर्ती मानले जातात.
व्यासपीठावरून शिवसेनेच्या शिंदे पिता पुत्रांवर अनेक वेळा टीका
ठाणे जिल्ह्याचा विचार करता केंद्रीय मंत्रीमंडळात अद्याप पर्यंत जिल्ह्याच्या कोणत्याही नेत्याला स्थान मिळालेले नव्हेत. त्यातच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य वाढत असून मराठा समाजाचे आक्रमक नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी खा.कपिल पाटील यांना केंद्राची ताकद दिल्यास जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न भाजपचे खासदार कपिल पाटील हे करतील म्हणून त्यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्याचे स्पष्ट झाले. खा.कपिल पाटील यांना शिवसेनेच्या शिंदे पिता पुत्रांकडून आडकाठी येत असल्याच्या चर्चा होत होत्या. त्यातच खासदर कपिल पाटील यांनी अनेक वेळा जाहीर कार्यक्रमांमध्ये व राजकीय व्यासपीठावरून शिंदे पिता पुत्रांवर अनेक वेळा टिका देखील केल्या आहेत.
दि. बा. पाटील यांच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावं लागते हे दुर्दैव
खा.कपिल पाटील हे आगरी समाजाचे असून नवी मुंबई विमानतळाला स्व.लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून आगरी समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्यातच शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपदेखील या आंदोलनांमध्ये आपली राजकीय पोळी भाजत असल्याने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा.कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू दिली. तसेच नवी मुंबई विमानतळाला जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय खासदार दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी काही दिवसापूर्वीच हजारो भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावे लागते हे दुर्दैव असल्याची खंत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली होती.
२०१५ सालीच नामांतराचा विषय मांडला होता
खासदार कपिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार २०१५ सालीच विमानतळाला जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तसेच २०१६ साली दिल्लीतील संसद अधिवेशनात केंद्र सरकारकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र दिल्लीला पक्षाच्या कामासाठी जावे लागल्याने आपण नवीमुंबईतील घेराव आंदोलनात सहभागी होऊ शकलो नाही. याबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. भिवंडी लोकसभा मतदार संघात भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. तसेच पालघर, ठाणे, रायगड, या तीन जिल्ह्यात आगरी – कोळी समाजाचे राजकीय प्राबल्य असल्याने त्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडली आहे असे म्हटले जात आहे.