इंडियन स्वच्छता लीग” स्वच्छता मोहिमेत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव यांच्या उपस्थितीने उत्साही वातावरण
मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात स्वच्छ अमृत महोत्सव साजरा केला जात असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाली.
महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्वच्छता लीग रॅली यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (पर्यावरण) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख, महानगरपालिका कर्मचारी, शहरातील सुजाण नागरिक, विविध शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, एनसीसी, स्काऊट, एनएसएस यासारख्या संस्थेचे विद्यार्थी इत्यादींचा प्रामुख्याने सहभाग होता.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक 1 अंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, प्रभाग समिती क्रमांक 2 अंतर्गत भाईंदर स्थानक पश्चिम, प्रभाग समिती क्रमांक 3 भाईंदर स्थानक पूर्व, प्रभाग समिती क्रमांक 4 आयुक्त निवास, प्रभाग समिती क्रमांक 5 मिरा रोड स्थानक, प्रभाग समिती क्रमांक 6 काशीमिरा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणावरून महानगरपालिका विभागप्रमुख व कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी, सामाजिक संस्था यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची रॅली काढून शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्रासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाचे सावट असून देखील आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता लीग रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली. या उपक्रमात नागरिकांनी नियोजित केलेल्या मार्गावरून साफसफाई व प्लास्टिक मुक्त शहर म्हणून स्वच्छता मोहीम राबवली. नागरिकांना/शालेय विद्यार्थ्यांना साफसफाई करण्यासाठी हॅण्ड ग्लोव्हज व कचरा उचलण्यासाठी बॅग देण्यात आली होती. इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाला अंदाजे 4000 ते 45000 नागरिक, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली.
प्रभाग निहाय स्वच्छता मोहिमेनंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व नागरिकांनी विपश्यना केंद्र, रामदेव पार्क, मिरा रोड येथे उपस्थिती दर्शवली. सदर विपश्यना केंद्रात “इंडियन स्वच्छता लीग” ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव हे देखील उपस्थित राहिले.
सदर ठिकाणी आमदार गीता भरत जैन, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी उपमहापौर हसमुख गहलोत, माजी सभागृह नेता प्रशांत दळवी, तसेच माजी नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होते.
उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक संस्था व विविध शाळांचे प्रतिनिधी यांना आयुक्त, आमदार, “इंडियन स्वच्छता लीगचे” ब्रँड ॲम्बेसेडर, सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
सकाळ पासूनच पावासाचे सावट असून सुद्धा मिरा भाईंदर शहरवासीयांनी, विविध शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, एनसीसी, स्काऊट, एनएसएस विद्यार्थी यांनी मोहिमेत उत्स्फूर्तरित्या सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी केल्याने मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व मिरा भाईंदर शहरास भारतातील सर्वात स्वच्छ शहर करण्याच्या प्रयत्नामध्ये सर्वांचा सहभाग मोलाचा राहणार आहे अशा प्रकारे भावना व्यक्त केल्या.
विपश्यना केंद्र येथील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त, सर्व अधिकारी/कर्मचारी व “इंडियन स्वच्छता लीग” ब्रँड ॲम्बेसेडर यांनी वेलंकनी बीच येथे “इंडियन स्वच्छता लीग” स्टार कॅम्पेनर कुमार हर्षद ढगे याच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बीच क्लीनअप मध्ये सहभाग नोंदवून समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत हातभार लावला.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याने मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले व या कार्यक्रमास पूर्णविराम देण्यात आला.