संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये भेट झाली. त्यानंतर मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली. मनसेच्या परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून संभ्रम असल्याचं पाटील यांनी ठाकरेंना सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी पाटील यांना त्यांच्या भाषणाची लिंक पाटील यांना पाठवली आहे. यामध्ये राज यांची परप्रांतीयांबद्दलची भूमिका आहे. दरम्यान, मनसेसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मनसे शत्रूपक्ष नाही. पण, भाषेच्या संदर्भातील त्यांची भूमिका भाजपला मान्य नाही, असे सांगताना हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची आहे. अलीकडील काळात मनसेने तशी भूमिका घेतली आहे. मात्र, भाषेसंदर्भातील भूमिका मनसेने बदलली, तर विचार करता येऊ शकतो. पण, आताच्या घडीला मनसेसोबत युतीची कोणतीही चर्चा नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या मनसेची परप्रांतीयांची भूमिका अतिशय आक्रमक आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा परप्रांतीयांना चोप दिला आहे. त्यामुळेच भाजपनं मनसे सोबतच्या युतीवरून सावध पवित्रा घेतला आहे. नाशिक भेटीत राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत मनसेच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर चर्चा झाली. तुमच्या मनातील संभ्रम लवकरच दूर करतो. परप्रांतीयांची भूमिका स्पष्ट करणाऱ्या मुलाखतीची लिंक लवकरच तुम्हाला पाठवतो, असं राज यांनी पाटील यांना सांगितलं होतं.
चंद्रकांत पाटील यांच्या मनातील गैरसमज आणि संभ्रम दूर करण्यासाठी राज यांनी त्यांना एका मुलाखतीची लिंक पाठवल्याचं समजतं. सध्या पाटील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी साताऱ्यात आहेत. त्यांनी अद्याप राज यांनी पाठवलेली लिंक पाहिलेली नाही. मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय भाजप नेतृत्त्वाकडून घेण्यात येणार आहे.
मात्र मनसेसोबतच्या युतीविषयी तूर्तास कोणतीही चर्चा नाही. याबद्दल सध्याच्या घडीला चर्चा सुरू नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मनसे आमच्यासाठी शत्रूपक्ष नाही. मात्र भाषेच्या मुद्द्यावरून भेदभाव करायचा नाही हे आमचं धोरण आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. त्यांचीही भूमिका हिंदुत्ववादी आहे, असं फडणवीस पुढे म्हणाले.