मुंबई, प्रतिनिधी : गेल्या वर्षभरापासून जगातील अनेक देश कोरोना महामासाथीचा सामना करत आहेत. अनेक देशात लाॅकडाऊनसारख्या पर्यायाचा सातत्याने अवलंब करावा लागत आहे. भारतासह बहुतेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली तरी देखील गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ झाल्याचे दिसत असून त्यामुळे आता कोरोनाची दुसरी लाट येणार आणि ती पूर्वी पेक्षा हि भयंकर असणार असे दिसत आहे. कारण काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही दुसरी लाट अधिकच भयंकर असल्याचं स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांत जगातील 46 देशांमधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची आकडेवारी पाहिली. ज्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली त्या देशांमध्ये भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. या 46 देशांमध्ये मार्च ते मे 2020 दरम्यान आलेल्या पहिल्या लाटेत 2.20 लाख जणांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान याच 46 देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 6.20 लाख लोक मृत्यूमुखी पडले. म्हणजे जवळपास मृतांच्या आकडेवारीत 4 लाखांनी वाढ झाली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम युरोपीय देशांमध्ये दिसून आला. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलॅंड, स्पेन आणि स्वीडनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. तसंच ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेतील लाखो लोक मृत्यूमुखी पडले.
अमेरिकेत मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोरोनाचे एकूण 1 कोटी रुग्ण सापडले. पण त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत ही संख्या वाढून 2 कोटींवर पोहोचली. फ्रान्स, इटली आणि स्पेनमध्ये दुसऱ्या लाटेमुळे मोठे नुकसान झाले.
या सगळ्यात अत्यंत भीतीदायक गोष्ट म्हणजे ब्रिटन आणि आफ्रिकी देशांमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा नवा आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट आढळून आला. सध्या ब्रिटन आणि आफ्रिकेतील कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सर्वाधिक नुकसानकारक ठरत आहे. तसंच तो अन्य देशांमध्ये वेगानं फैलावत आहे.
इस्त्राईलमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. जगभरात प्रतिमहिना मृत्यूदर पाहिला तर तो ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान प्रति एक लाखांमध्ये 12 असा होता. तर मार्च ते मे दरम्यान प्रति एक लाखांत 8 होता.
त्यामुळे आता भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यास ती पूर्वी पेक्षा हि भयंकर असणार अशी शक्यता वर्तविली जात आहे आणि म्हणून सर्वच नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे काटोकोरपणे पालन करावे असे आवाहन सरकार तर्फे करण्यात येत आहे.