संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी ‘यू एन मेहता’ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.
“एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत. “मी तिला १०० व्या वाढदिवसानिमित्त भेटलो होतो तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, बुद्धीने काम करा आणि शुद्धपणे आयुष्य जगा,” असंही मोदींनी अन्य एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
‘यू एन मेहता’ रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘यू एन मेहता’ रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.
हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अथक परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळे सातत्याने चर्चेत असतात. नरेंद्र मोदी हे देशासाठी सर्वस्व झोकून देऊन दिवसरात्र काम करतात, असे त्यांच्या समर्थकांकडून अभिमानाने सांगितले जाते. मोदींच्या याच गुणाचा प्रत्यय शुक्रवारी देशवासियांना आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. नरेंद्र मोदी यांनी साधारण सहाच्या सुमारास ट्विट करुन आईच्या निधनाबद्दल सर्वांना माहिती दिली. यानंतर नरेंद्र मोदी आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अहमदाबाद येथील आपल्या भावाची घरी पोहोचले. येथून सकाळी आठच्या सुमारास हिराबेन मोदी यांची अंत्ययात्रा निघाली. यानंतर तास-दीड तासात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. आईच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करतील, असा अनेकांचा अंदाज होता. परंतु, नेमक्या याचवेळी नरेंद्र मोदी यांनी आपण इतरांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. पंतप्रधान मोदी हे आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा देशसेवेसाठी रुजू झाले.