संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
२१ दिवसात ११ हजाराहून जास्त डोंबिवलीकरांची पसंती
डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शहरशाखा येथे कोरोना काळात नियमित मोफत शिवभोजन थाळी सुरु असून दररोज ५०० हून अधिक नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ मिळतोय. कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य व गरजू लोकांना पोटभर जेवण मिळण्याच्या उद्देशाने मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी मोफत शिवभोजन थाळी देण्याचे जाहीर केले होते. याच उद्देशाने व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने, श्री.राजेश गोवर्धन मोरे (शिवसेना शहर प्रमुख, माजी सभागृह नेता) यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या वतीने गरीब व गरजू लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप सुरु केले आहे. वाटप सुरु झाल्यापासून आतापर्यंत दररोज ५०० हून अधिक गरजू नागरिक या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत.
शिवभोजन थाळी म्हणजेच नुसती चपाती भाजी नव्हे तर दररोज २ चपाती, विविध प्रकारच्या भाज्या, वरण, भात, लोणचे ई. अन्नपदार्थांचा समावेश या शिवभोजन थाळी मध्ये असून रोज नवीन नवीन पौष्टिक व सकस अशा भाज्यांचा समावेश केला जातो. “शिवभोजन थाळी” साठी जेवण बनवण्यासाठी ‘आई एकविरा’ व ‘माउली’ या महिला बचत गटांना याची जबाबदारी सोपविण्यात आली असून या बचत गटांमधील महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे.
राज्यभरात लॉकडाऊनची परिस्तिथी असल्यामुळे ‘शिवभोजन थाळी’ हि पार्सल स्वरुपात नागरिकांना दिली जाते. या योजनेमुळे अनेक गरीब निराधार व गरजू लोकांना पोटभर सकस व चांगल्या गुणवत्तेचे जेवण मिळत असल्याचे नागरिक स्वतःहून शिवसेना मध्यवर्ती शहरशाखेस भेट देऊन सांगत असल्याचेही पाहायला मिळत असल्यामुळे त्यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व राजेश मोरे, शहर शाखेचे आभार मानले.