संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी
मिरा भाईंदर महानगपालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला असून ते भाजप कार्यकर्त्या प्रमाणे महासभेचे कामकाज करीत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेत्यांसह शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी केला तर भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी वासुदेव शिरवळकर महासभेचे कामकाज पक्षपातीपणे करीत असल्याचा आरोप करून त्यांची बदली इतर विभागात करून त्यांच्या ऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक नगरसचिव पदावर करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकारावरून महापालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे की काय? असा सवाल शहरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.
आधीच्या महासभेची तहकूब महासभा गेल्या बुधवारी 19 एप्रिल रोजी बोलावण्यात आली होती या महासभेत परिवहन सेवेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी असा ठराव भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी मांडला होता. त्याच वेळी या ठरावाच्या विरोधात भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी देखील ठराव मांडला आणि आपल्याच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी दोन वेगवेगळे ठराव मांडल्यामुळे या ठरावांवर मतदान घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली आणि या ऑनलाईन महासभेमध्ये सत्ताधारी भाजपचे अनेक नगरसेवक गैरहजर असल्याने बहुमत मिळविण्यासाठी भाजपच्या नेत्यांची एकाच तारांबळ उडाली होती. महासभा चालू असताना महापौर ज्योत्सना हसनाळे अचानक उठून सभागृहात बाहेर गेल्या तर त्यांच्या पाठोपाठ उपमहापौर आणि आयुक्त देखील उठून बाहेर निघून गेले आणि या सगळ्या गोंधळामुळे महासभेत नक्की हे सर्व चालले आहे तरी काय?असा प्रश्न उपस्थितानां पडला.
दरम्यान भाजच्या नेत्यांकडून या महासभेत गैरहजर असलेल्या नगरसेवकांना फोनाफोनी करून ऑनलाईन हजर राहून मतदानात सामील होण्यासाठी फर्मावण्यात आले. परंतु ज्यावेळी महासभा चालू होते त्यावेळी उपस्थित नगरसेवकांची संख्या किती? आणि प्रत्यक्ष मतदानात भाग घेतलेले नगरसेवकांची संख्या किती? हे सांगण्यास नगर सचिव वासुदेव शिरवळकर यांनी मात्र नकार दिला आणि सत्ताधारी भाजपच्या बाजूने संख्याबळ पुरेसे नसताना गैरहजर असलेल्या नगरसेवकांना मतदानात सामील होण्याची संधी नगरसचिव यांनी दिली असा आरोप शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील आणि गटनेत्या नीलम ढवण यांनी केला आहे.
अखेर भाजपच्या दोन्ही ठरावांवर मतदान घेतले असता ठरावाच्या बाजूने 42 तर भाजच्या बंडखोर नगरसेवकांसह शिवसेनेची सर्व मते मिळून ठरावाच्या विरोधात 31 मतं पडली तर काँग्रेसचे 07 नगरसेवक तटस्थ राहिले अशी एकूण उपस्थित नगरसेवकांची संख्या 80 असल्याची माहिती नंतर नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी दिली आहे परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी किती नगर सेवक उपस्थित होते? जे गैरहजर होते त्यांना मतदान करण्याची संधी का देण्यात आली? या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.
मुळात महासभेत जेंव्हा एखादा ठराव मांडला जातो त्यावेळी महासभेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सदस्यांनाच मतदान करण्याची संधी दिली जाते. तात्पुरत्या कामासाठी किंवा अगदी स्वच्छता गृहाचा वापर करण्यासाठी देखील सभागृहाच्या बाहेर गेलेल्या सदस्यांना मतदान सुरू असताना सभागृहात प्रवेश दिला जात नाही किंवा त्यांना मतदानात भाग घेता येत नाही असा सभाशास्त्राचा नियम असताना बुधवारी झालेल्या महासभेत मात्र ऑनलाईन महासभेचा गैरफायदा घेऊन आणि सभागृहाचे नियम धाब्यावर बसवून गैरहजर सदस्यांना मतदान करण्याची संधी देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष शिवसेनेने केला आहे.
नगरसचिव सभागृहात पक्षपातीपणे कामकाज करीत असून सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे कामकाज करीत आहेत यापूर्वी देखील अनेकवेळा नगर सचिव वासुदेव शिरवळकर यांनी सत्ताधारी भाजपला झुकते माप देत त्यांच्या सोयीची भूमिका घेतली आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी तर थेट महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून वासुदेव शिरवळकर यांची बदली इतर विभागात करून त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. आता यावर आयुक्त काय निर्णय घेतात हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.