संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याणच्या तहसील कार्यालयातील तलाठी अमृता बडगुजर आणि तिचा खासगी सहाय्यक अनंत कंठे यांना २३ मार्च रोजी ४५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या घटनेला १३ दिवस होत नाही तोच मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे याच्याही विरोधात १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत विभागाने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदाराच्या खडवली जवळील मु. गेरसे येथे सर्व्हे नंबर १० हिस्सा नंबर ४/अ या एकूण क्षेत्र हेक्टर ४२ आर ५ प्रती या खरेदी केलेल्या जमीनीवर अधिकार अभिलेखात ७/१२ वर नाव दाखल करण्याकरिता मौजे गरसेच्या तलाठी अमृता बडगुजर हिला १० हजार रूपये दिले होते. तर २3 मार्च रोजी केलेल्या पडताळणीत मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे यानेही तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे याच्या कार्यालयातील त्याचा साथीदार निलेश चौधरी याने लाचेच्या मागणीस प्रोत्साहनात्मक स्वरूपाचे वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मंडळ अधिकारी राजेंद्र बाबुराव बोऱ्हाडे याच्यासह त्याचा साथीदार निलेश बाळाराम चौधरी या दोघांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे (सुधारीत २०१८) चे कलम ७, ७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनाक्रमानंतर कल्याणच्या तहसील कार्यालयाला लागलेले लाचखोरीचे ग्रहण कधी संपणार, अशा चर्चा या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांत रंगलेल्या दिसत आहेत.