संपादक: मोईन सय्यद/मिरारोड प्रतिनिधी
दोन वर्षाच्या कार्यकाळात २३० पक्षाघात रूग्णांवर यशस्वी उपचार
पक्षाघातून बरे झालेले रूग्ण सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून करणार जनजागृती…
मिरारोड : पक्षाघात या आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयाने सर्व्हायव्हर ग्रुप बनवला असून यावेळी खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाघातातून वाचलेल्या ३० हून अधिक रूग्णांनी यात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात पक्षाघात या आजारावर यशस्वीरित्या मात करून आयुष्य़ जगणाऱ्या शीन फिगेरेडो या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
मेंदूला ऑक्सिजन व पोषणमूल्यांचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाल्याने किंवा त्या वाहिन्या फुटल्याने पक्षाघात होतो. पक्षाघाताचे दोन प्रकार आहेत. रोहिण्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने इस्केमिक स्ट्रोक येतो. तर रक्तवाहिन्या फुटल्यावर रक्त वाहून जाते आणि त्यामुळे हेमोराजिक स्ट्रोक येतो. सध्या तरूणांमध्ये पक्षाघाताचा धोका वाढताना दिसून येत आहे. धुम्रपान, मद्यपान, मधुमेह, लठ्ठपणा, विनाकारण औषधांचा वापर आणि कौटुंबिक इतिहास हे यामागील मुख्य कारणं आहेत.
मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै म्हणाले की, “पक्षाघातामुळे दरवर्षी लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. पक्षाघाताचा झटका आल्यास रूग्णाला ५ तासात उपचार मिळणे गरजेचं असतं. वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावू शकतो. सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत २३० पक्षाघात झालेल्या रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी १४४ पुरूष आणि ८६ महिलांचा समावेश होता. यातील ३१-४० वयोगटातील २३ रूग्ण, ४१-५० वयोगटातील ३६ रूग्ण, ५१-६० वर्ष वयोगटातील ५९ रूग्ण ६१-८० वयोगटातील १०० रूग्ण आणि ८० वर्ष वयोगटातील १२ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. पक्षाघाताबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी यातून बरे झालेल्या रूग्णांचा एक स्ट्रोक सर्व्हायव्हर्स ग्रुपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ३० रूग्णांचा सत्कार करण्यात आला. हा कार्य़क्रम दर तीन महिन्यांनी घेतला जाईल. जेणेकरून रूग्ण आपले अनुभव सांगू शकतील.”
स्ट्रोक सर्व्हायव्हर शीन फिगेरेडो म्हणाले, “पक्षाघात होईपर्यंत मला या आजाराबद्दल काहीही माहिती नव्हतं. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला पुन्हा जगण्याची संधी मिळाली आहे. पक्षाघात रूग्णावर वेळीच उपचार होणं गरजेचं आहे, याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी रूग्णालयाने स्ट्रोक सर्व्हायव्हर ग्रुप तयार करून चांगला पुढाकार घेतला आहे.”