संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
प्रवर्तन निदेशालय अर्थात ‘ईडी’ ने आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथे दोन ठिकाणची मालमत्ता जप्त केली असून, या कारवाई नंतर खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी “मी तुमच्या बापालाही घाबरत नाही” अशा आक्रमक शब्दांचा वापर करत थेट इशाराच दिला आहे.
एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने त्यांची अलिबागमधील ८ प्लॉट ची जमीन आणि दादर मधील एक फ्लॅट जप्त केला असून, यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘मी तुमच्या बापालाही घाबरत नाही,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत आहेत. संपत्ती म्हणताय तर तीथे राहते घर असेल किंवा कुणी कष्टाच्या पैशांतून घेतलेले असेल तर त्याचा संबंध कुठे तरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. “मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत”, असे राऊत यांनी म्हटले आहे.
माझी संपत्ती काही नाही, जमिनिचा तुकडा आणि राहतं घर याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्याच बदलावी लागेल. माझे राहते घर फार तर २ रूम किचन एका मराठी माणंसाचे घर, एका मध्यमवर्गिय माणसाचे घर आहे. अलिबाग माझे गाव, तेथे साधारणपणे ५० गुंठ्याची जमिन, याला कुणी संपत्ती म्हणत असेल, तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. एवढेच नाही, तर अशा कारवायांपुढे संजय राऊत आणि शिवसेना झुकणार नाही आणि वाकणारही नाही, असेही राऊत म्हणाले.