संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची ईडीकडून कारवाई करण्यात आली असून संजय राऊत यांना मोठा दणका दिला आहे. तसेच याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार ईडीकडून अलिबाग मधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावाने अलिबाग मध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण ८ प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे.
याबाबत गेल्या दीड महिन्यापासून ईडीकडून त्यांच्याकडे विचारणा सुरू होती. त्यादरम्यान मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्यामुळे पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. या आलेल्या संशयातूनच ईडीने आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका देण्यात आला आहे. तसेच अलिबाग मधील एकूण ८ प्लॉट आणि दादर मधील एक फ्लॅट ईडीने जप्त केला असून, याचा संबंध संजय राऊत यांच्याशी असल्याचं म्हटलं आहे.
या आधी गोरेगावमधील पत्राचाळचा घोटाळा जवळपास १०३४ कोटींचा आहे. म्हणूनच या घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. तर या चौकशी अंतर्गत प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.