संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
भारतीय खो-खो महासंघाने काही दिवसांपूर्वी आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेची घोषणा केली होती. त्यानुसार चौथ्या आशियायी खो-खो स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे ६ ते १९ जुलै या कलावधीत प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. सपूर्ण देशातून १२० मुले या प्रशिक्षण शिबिरासाठी निवडण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशभरातून १२ प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून प्रतिक वाईकर, अक्षय बांगर, अनिकेत पोटे, ॠषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, राहूल सावंत, सागर लेंगरे, गजानन शेंगाळ, अरुण अशोक गुणकी, दुर्वेश साळुंखे अशा मातब्बर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या १२० खेळाडुंमधून भारताच्या संघाची निवड केली जाणार आहे. १२ पैकी ३ प्रशिक्षक महाराष्ट्रातून निवडल्याचे फेडरशेनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी कळविले आहे.
खो-खो खेळाडूंचे कौशल्य आणि खेळातील बारकावे व परिणामकारकता वाढविण्यासाठी या राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे प्रमुख म्हणून फेडरशेनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव आणि महाराष्ट्र समन्वयक म्हणून शिरीन गोडबोले यांच्याकडे जबबाबदारी सोपवण्यात आली आहे.