मिरा-भाईंदर, विशेष प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हटाव आणि भाजपा व शहर बचाव अशी मोहीम छेडणाऱ्या भाजपातील प्रमुख नगरसेवक – पदाधिकाऱ्यां पैकी एक असलेले नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून मिरा-भाईंदर शहरात लवकरच एक नवीन राजकीय समीकरण तयार होणार असल्याची चर्चा केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मिरा-भाईंदर भाजपामध्ये नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा मोठा गट माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या एकाधिकारशाही आणि एकूणच कार्यपद्धती व त्यांच्या वादग्रस्त प्रतिमे विरुद्ध एकत्र आले आहेत. पालिकेतील अर्थपूर्ण हस्तक्षेप आणि मेहतांच्या चेहऱ्यावर पुढील पालिका निवडणूक भाजपाला जिंकता येणार नाही अशी भूमिका त्यांच्या विरोधी गटाने घेतली असून भाजप समर्थकांचा गट म्हणजे ए ग्रुप आणि मेहता यांच्या समर्थकांचा बी ग्रुप असे दोन गट शहरात तयार झाले आहेत. आणि ह्याच ‘ए’ गटाने मेहता हटाव व भाजपा आणि शहर बचाव अश्या प्रकारची मोहीम छेडली असून दुसरीकडे मेहता यांनी देखील पालिका आणि पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी हालचाली चालवल्या आहेत.
नरेंद्र मेहतांना थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रवींद्र चव्हाण आणि केंद्रातील अनेक बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळेच विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊन देखील आणि त्यांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात बलात्कार सह अनेक गंभीर गुन्हे व तक्रारी दाखल असून देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठी कडून त्यांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मेहता विरोधकांनी देखील जोरदार आघाडी उघडत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारती यांच्याकडे तक्रारी करत मेहतांच्या कारांनाम्यांचा पाढाच वाचला असून नरेंद्र मेहातांच्या नेतृत्वाखाली यापुढे पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही अशी शक्यता वर्तविली असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे मिरा-भाईंदर प्रभारी आमदार मिहीर कोटेचा यांनी भाजपच्या नगरसेवकांची आणि जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांची भेट घेतली होती. कोटेचा यांना शहराचे प्रभारी नेमलेले असताना रवींद्र चव्हाण यांचा मेहतांसाठीचा हस्तक्षेप देखील चर्चेचा विषय ठरला आहे .
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे महामंत्री व नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी आपल्या समर्थकांसह मिरा-भाईंदर शहरातील अनुभवी व दिग्गज राजकारणी मानले जाणारे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा ह्यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. वास्तविकत: पूर्वी व्यास हे मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आले होते त्यांच्या दोघांमध्ये काही व्यक्तिगत मतभेद झाल्यामुळे रवि व्यास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन ते भाजपात प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. तर गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यामुळे २००७ साली अपक्ष नगरसेवक असलेले नरेंद्र मेहता हे महापौर झाले होते.
रवी व्यास यांचे शहरातील राजकीय वजन, त्यांचे समर्थक व त्यांच्या समर्थनार्थ असलेले भाजपचे नगरसेवक यांची संख्या पाहता त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही असे चित्र सध्या तरी मिरा-भाईंदर शहराच्या राजकारणात निर्माण झाले आहे आणि म्हणून आता भाजपच्या पक्षश्रेष्ठी कडून काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यांनी मेहतांच्या विरोधात आघाडी उघडली असतानाच अशा प्रकारे अचानक माजी आमदार मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे . मेंडोन्सा हे शहराचे अनेक वर्ष नेतृत्व करत होते आणि मिरा-भाईंदर शहरात एक राजकीय व्यक्ती म्हणून मेंडोन्सा यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे.
महानगरपालिकेत नरेंद्र मेहतांचा आवाजव हस्तक्षेप रोखण्यासाठी अनेक नगरसेवकांनी तक्रारी करून देखील भाजपाच्या वरिष्ठां कडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे . त्यातच व्यास यांनी मेंडोन्सा यांची भेट घेतलयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रवी व्यास यांनी स्वतः मात्र हि कोणती राजकीय भेट नव्हती असे स्पष्ट करत मेंडोन्सा यांची फक्त सदिच्छा भेट होती असे सांगितले असून मेंडोन्सा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काही जुन्या आठवणींत गप्पा रंगल्याचे ते म्हणाले. या संदर्भात गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण या विषयावर योग्य वेळी बोलू असे सांगितले. मात्र गिल्बर्ट मेंडोंसा आणि रवी व्यास यांच्या ह्या बैठकीमध्ये काहीतरी राजकीय गुपीत दडलेले आहे एव्हढे मात्र नक्कीच आहे अशी चर्चा शहरात रंगली आहे.