आपलं शहर

भ्रष्टाचाराचे प्रवेशद्वार! कर्जबाजारी महानगरपालिकेची प्रवेशद्वाराच्या नावावर कोट्यवधीची उधळपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणखीन एक नवीन घोटाळा?

भाईंदर, प्रतिनिधी : एकीकडे मिरा भाईंदर महानगरपालिका जवळपास पाचशे कोटींच्या कर्जात बुडालेली असताना आणि सार्वजनिक आरोग्य सारख्या अनेक अत्यावश्यक सेवेसाठी निधी उपलब्ध नसताना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र शहरातील अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांवर वायफळ खर्च करण्याचा सपाटा लावला असून कोट्यावधी रुपयांची लूट चालवली असल्याचा आरोप शहरातील नागरिकां कडून केला जात आहे.

मिरा भाईंदर शहरात गरज नसताना देखील स्मशानभूमी, उद्याने, प्रशासकीय इमारती, सार्वजनिक रुग्णालये अशा विविध ठिकाणी आधीची असलेली प्रवेशद्वारे तोडून त्याठिकाणी नवीन प्रवेशद्वार बनवून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी चालविली असल्याचा आरोप केला जात आहे.
मिरा भाईंदर शहरातील परिवहन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, शालेय शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, योग्य नियोजनाअभावी योग्य ती सार्वजनिक आरोग्य सेवा देखील नागरिकांना मिळत नाही.

शहराच्या कर उत्पन्नात मोठी तूट निर्माण झालेली असून निधी अभावी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन देखील वेळेवर दिले जात नाही अशा महानगरपालिकेवर अंदाजे पाचशे कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागात मात्र वारेमाप उधळपट्टी होत असून शहरातील नगरसेवक, राजकीय पक्षाचे नेते, शहर अभियंता शिवाजी बारकुंड आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खंबीत यांच्या संगनमताने अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांच्या निविदा बेकायदेशीरपणे काढल्या जात आहेत असा आरोप केला जात आहे.

मिरा भाईंदर शहरासह संपूर्ण देशात कोरोना सारख्या भयंकर साथ रोगाने थैमान घातले आहे. नागरिकांच्या अत्यावश्यक आरोग्यसेवेसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही अशा कठीण परिस्थितीत देखील गरज नसलेली विकासकामांवर भरमसाठ खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभातील अधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदार यांचे उखळ पांढरे केले जात असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी व्यक्त केली आहे

शहरातील नाले, गटार, रस्ते आणि फुटपाथ यांच्या दुरुस्ती सुशोभीकरणच्या नावावर दरवर्षी निविदा काढून पुन्हा पुन्हा तीच तीच कामं करून नगरसेवक, ठेकेदार आणि अधिकारी आपली नियमित कमाई करून घेत आहेत. एकच नाला, गटार तोडून पुन्हा बनविला जातो, एकाच रस्त्याचे वर्षातून अनेकवेळा डांबरीकरण केले जाते तर एकाच फुटपाथचे वर्षातून अनेकवेळा सुशोभीकरण केले जाते तर शहरातील सुस्थितीत असलेले चौक तोडून पुन्हा बनविले जातात.

अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाने भ्रष्टाचार करण्याचे हे एक नवीन प्रवेशद्वार उघडले असून या भ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षाचे वरीष्ठ नेते, नगरसेवक पासून ते अगदी विरोधीपक्षाचे नगरसेवक देखील सामील झाले असल्यामुळे एकही लोकप्रतिनिधी या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलत नाही. या सगळ्यांनां “मॅनेज” करण्याची कला सार्वजनिक बांधकाम विभागाचे “धीरूभाई” म्हणवले जाणारे कार्यकारी अभियंता यांच्याकडे असल्यामुळे ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ प्रमाणे राजरोसपणे करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील काँक्रीटच्या रस्त्याच्या बांधकामात आणि बीएसयूपी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले असून विभागीय आयुक्त, कोकण विभागा तर्फे त्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे या सर्व भ्रष्टाचाराच्या ‘प्रवेशद्वाराची’ देखील सखोल चौकशी झाल्यास कुणी कुणी यात मलिदा खाल्ला आहे? ते उघडकीस येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून “मिरा भाईंदर महानगरपालिकेतील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही” अशी घोषणा मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी केली असून या आता भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी देखील त्या राज्य शासनाकडे करतील काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *