Latest News आपलं शहर महाराष्ट्र

चक्रीवादळाला न जुमानता भर पावसात पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन; कोविडच्या नियमांचा उडाला फज्जा!

संपादक: मोईन सय्यद / मीरा भाईंदर प्रतिनिधी

फुकटच्या कार्याचे श्रेय घेण्याची हौस आणि प्रसिद्धीचा हव्यास यासाठी राजकीय नेते काय काय उपद्व्याप करतील? काहीच सांगता येणार नाही. याचा चांगलाच प्रत्यय आज मिरा भाईंदर शहरात नागरीकांना आला. एकीकडे तोक्ते चक्रीवादळाचा हैदोस, मुसळधार पाऊस तर दुसरीकडे जमावबंदी, कोविडच्या नियमांचे बंधन या सर्व गोष्टींना न जुमानता, भर पावसात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदर पश्चिमेकडील पं. भीमसेन जोशी रुग्णालयाच्या आवारात आज ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पोलीस आयुक्त सदानंद दाते, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेता प्रशांत दळवी, स्थायी समिती सभापती दिनेश जैन व मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते मात्र आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि नियमांचे पालन करण्याची सर्व प्रथम जबाबदारी आपली आहे याचे भान यांपैकी कुणालाही राहिले नव्हते.

मिरा भाईंदर महानगरपालिका ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्णतेकडे

मिरा भाईंदर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात आणि त्यामुळे शहरातील रुग्णालयात ऑक्सिजनची वाढती मागणी या गोष्टी विचारात घेत मिरा भाईंदर महानरपालिके तर्फे रुग्णालयीन व्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांना उपचार करताना मोठया प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती त्याची दखल घेत आमदार गीता जैन यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे शहरासाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांटची मागणी करून त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या निधीची मंजुरी मिळवून घेतली होती. त्यानुसार भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भिमासेन जोशी रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला. त्याच ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज सोमवार दि. १७ मे, २०२१ रोजी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

भविष्यात मिरा भाईंदर शहरतील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून  1 कोटी 80 लाख रुपये खर्च करून या प्लांटची निर्मिती करण्यात आली असून प्रतिदिन १७५ ऑक्सिजनचे जंबो सिलेंडरची निर्मिती करण्याची क्षमता या प्लांटमध्ये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मिरा भाईंदर शहराला या ऑक्सिजन निर्मिती प्लांटची अत्यंत आवश्यकता होती असे असले तरी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवादळाने थैमान घातले आहे. आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याच बरोबर कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जमाबंदी, सोशल डिस्टनसिंग, तोंडाला मास्क लावण्याची सक्ती या नियमांचे बंधन देशातील सर्वच नागरिकांना घालण्यात आलेले आहेत. आणि म्हणून या सर्व नियमांचे पालन आधी लोकप्रतिनिधी यांचे कडून केले जावे अशी रास्त अपेक्षा नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे गर्दी जमविणारे कार्यक्रम टाळून हाच कार्यक्रम प्रतिआकात्मक स्वरूपात किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करून एक वेगळा आदर्श निर्माण करता आला असता. परंतु आजकालच्या राजकीय नेत्यांना कसलेच तारतम्य राहिले नसून फुकटच्या श्रेय घेण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून आपली हौस भागवून घेत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. सामान्य माणसाने कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा साधे तोंडावर मास्क न लावल्यास रोख दंडा सोबतच कठोर शिक्षा केली जात आहे. राजकीय नेत्यांना नियमांतून सूट आणि जनतेला मात्र कठोर बंधनं का? असा सवाल आता जनते कडून केला जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *