मीरा भाईंदर, प्रतिनिधि: भाईंदर पश्चिमेकडील 150 फूट रोड वर असलेले डी मार्टच्या लिफ्टमध्ये रविवारी संध्याकाळी 7.45 वा च्या सुमारास अचानक 15 नागरिक अडकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून अडीच तास अथक प्रयत्न करून रात्री 10 वाजता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतरच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
भाईंदर पश्चिमेकडे मॅक्सस मॉलच्या समोर असलेल्या डी मार्ट या शॉपिंग मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी येत असतात. तीन माजल्याचे हे डी मार्ट शॉपिंग मॉल गर्दीने गजबजलेले असते. या डी मार्टमध्ये वरच्या तीन मजल्यावर जाण्यासाठी जिन्या सोबतच लिफ्ट देखील लावण्यात आलेली आहे आणि खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक त्या लिफ्टचा वापर मोठया प्रमाणावर करीत असतात.
रविवारी सायंकाळी 7.45 सुमारास अशाच प्रकारे 15 जण लिफ्टचा वापर करून वर जात असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लिफ्ट अचानक बंद पडली आणि ते 15 नागरिक लिफ्टमध्ये अडकल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तातडीने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अडीच तास अथक प्रयत्न करून मोठ्या शिताफीने या 15 जणांची सुटका केली आणि उपस्थित सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
डी मार्ट सारख्या गजबजलेल्या आणि महत्वाच्या ठिकाणी इमारतीमध्ये बसविण्यात आलेली लिफ्ट अश्या प्रकारे अचानक बंद पडल्याने शहरातील इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या लिफ्टच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरातील हजारों इमारतीमध्ये विना परवाना लिफ्ट चालवल्या जात आहेत. त्याच प्रमाणे अनेक इमारतींना परवाना आहे परंतु त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नसल्याचे आता उघड झाले आहे.
मुळात नियमानुसार इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या लिफ्टचे दर वर्षी निरीक्षण करून त्याचा परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक असते. त्याच प्रमाणे प्रत्येक इमारतीच्या लिफ्टमध्ये हा परवाना दर्शनी भागाववर लावणे देखील बंधनकारक असते परंतु शहरातील अनेक इमारती या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्हणून आता या विषयावर महापालिका प्रशासन काय कारवाई करते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तो पर्यंत शहरातील नागरिकांची सुरक्षा मात्र टांगणीवर असणार आहे.