संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: गणेश नवगरे (सिंधुदुर्गनगरी)
तोक्ते या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मे पासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. अनेक घरांची पडझड होऊन छपरे उडून गेली आहेत. विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. झाडे रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पहाटे चार वाजता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.
समुद्र खवळलेला असून मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या नूतनीकरण सुरू असलेल्या सभागृहाच्या छपराचा काही भाग कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळून माती रस्त्यावर आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत एकूण ४० घरांचे, तसेच दोन गोठ्यांचे नुकसान झाले आहे. ३१ ठिकाणी झाडे पडली असून, तीन शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा आतापर्यंतचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात एकूण २७ घरांचे नुकसान झाले आहे. एका ठिकाणी झाड पडले असून दोन शाळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. विजेचा एक खांबही या तालुक्यात पडला आहे.
दोडामार्ग तालुक्यात आठ झाडे पडली असून, सावंतवाडी तालुक्यात सहा ठिकाणी झाडे पडली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे, तर पाच झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात दोन घरांचे नुकसान झाले असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. चार ठिकाणी झाडे पडली असून, एका ठिकाणी विजेचा खांबही पडला आहे.
मालवण तालुक्यात दोन ठिकाणी झाडे पडली असून, एका पत्र्याच्या शेडचे आणि वीजवाहक तारेचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात नऊ घरांचे, एका गोठ्याचे, एका शाळेचे नुकसान झाले आहे. तीन ठिकाणी झाडे पडली आहेत. देवगड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. दोन ठिकाणी झाडे कोसळली असून, एका ठिकाणी वीजवाहक तारेचे नुकसान झाले आहे.