भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरात राजकीय पटलावर अगदी सरपंच पदापासून अनेक पदं भूषविलेले काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, महानगरपालिकेचे माजी महापौर तुळशीदास दत्तू म्हात्रे यांचे दिर्घ आजारामुळे मंगळवार 01 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मिरा-भाईंदर शहराच्या कॉंग्रेसमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन सोबतच प्रदेशाध्यक्ष आणि महासूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर अनेक नेत्यांनी दुःख प्रगट केले असून त्यांना श्रद्धांजली वाहीली आहे.
संपुर्ण आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असेलेले तुळशीदास म्हात्रे यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात मिरा-भाईंदर शहराच्या सरपंच पदापासून सुरू केली तर त्यांचा हा राजकीय प्रवास मिरा-भाईंदर शहराचे महापौर पदापर्यंत पोहोचला होता. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करत असताना काँग्रेसचे पक्ष्याचे ब्लॉक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, स्थायी समिती सभापती आणि महापौर अशा प्रकारची अनेक महत्त्वाची पदे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भूषवली आहेत तसेच ते आगरी समाजाचे नेते देखील होते.
त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काँगेस पक्षाच्या वाढीसाठी केलेले त्याग आणि समर्पण हे फार मोलाचे आहे आणि म्हणूनच त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला कधीही भरून न-निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना काँगेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा पश्चात्य त्यांना दोन मुले व सुना नातू-नातवंड असा संयुक्त परिवार आहे.
माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळशीदास म्हात्रे यांच्या निधनामुळे अनुभवी समर्पित लोकसेवक हरपला असल्याचे बोलत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तुळशीदास म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहिली.