
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
भारतीय जनता पक्षाने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीही केली आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो, असं लेखी आश्वासन दिलं होतं. पण आजपर्यंत त्यांनी त्यांचा तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन इथं राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आलं. बंजारा टायगर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ.राजू वाघमारे, आदी उपस्थित होते.
बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून नाना पटोले म्हणाले की, स्व.वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक साहेबांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी राज्यात ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करून राज्याला प्रकाशात आणले, वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती झाली. बंजारा समाजाने राज्याला दिशा दाखवून दिली. बंजारा समाज हा आत्मसन्मासाठी लढणारा, देशहितासाठी काम करणारा समाज आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली. टायगरला इलाका नसतो आणि पंजा फक्त टायगरकडे असतो आणि आता टायगर (वाघ) काँग्रेसमय झाला आहे, असा मिश्किल टोला पटोले यांनी लगावला.