संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या नव्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका पाहता तो रोखण्यासाठी केंद्र शासनाने यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य..
तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश..
कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तो रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय व पर्याय आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाच्या नव्या ‘डेल्टा पल्स’ व्हेरियंटपासून संरक्षण करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यांतील लसीकरण यंत्रणांना दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्यावे अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यात किती नागरिकांचे ‘कोव्हिशील्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’चा दुसरा डोस घेणे बाकी आहे याची माहिती लसीकरण यंत्रणेला दिली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना लस घेतल्याशिवाय परतावे लागत आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक, ठाणे, डोंबिवली, कल्याण लसीकरण केंद्रांबाहेर लस घेण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासूनच २ किलोमीटर रांगा लावून उभे राहत आहेत. असे असतानाही मर्यादित लसींच्या साठ्यामुळे शेकडो नागरिकांना लस न घेता माघारी घरी जाण्याशिवाय पर्याय उरत नाही व दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे ४ वाजता रांगेत उभं राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही त्यामुळे ते हतबल झाले आहेत.
यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी पत्राच्या माध्यमातून राज्य सरकाराला दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र लसींच्य तुटवड्यामुळे अनेकांच्या दुसऱ्या डोसचा कालावधी लांबला असून असे असतानाही सर्व जिल्ह्यांमधील लसीकरण यंत्रणांनी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राथमिक प्राधान्य द्यावे असे पत्रात नमूद केले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ८०-९० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य आहे. सध्या लसीकरण हा एकमेव उपलब्ध उपाय असून त्यामुळे लसीकरण प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात आहेत.