संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यासह मुंबईत ही हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित, वित्त व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी सकाळी लवकर जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना देण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.