संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत
भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळमध्ये देशातल्या कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण आहेत. लसीकरण मोहीम, नियमांचं पालन असं सगळं असतानाही केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे? हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी 2020 मध्ये केरळमध्ये भारताचा पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. चीनमधल्या वुहान इथे शिकत असलेला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. देशातल्या कोरोना संसर्गाची ती सुरुवात होती. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली आणि ते हॉटस्पॉट बनलं. मार्च 2020 पर्यंत देशातल्या अधिक राज्यांमध्ये केरळपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती.
टेस्ट-ट्रेस-आयसोलेट या त्रिसुत्रीला प्रमाण मानत केरळने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोरोना वाढीला आळा घेतला. कोरोनाचा आलेख घसरणीला लागल्याचं चित्र केरळने देशाने दाखवलं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केरळने विषाणूला रोखण्यात यश मिळवलं. कोरोना मृत्यूदरही कमी होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केरळमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढलं. ऑगस्ट महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोना वाढीला आळा घातल्याचं चित्र असताना केरळमध्ये मात्र कोरोना शमण्याची चिन्हं नाहीत. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केरळमध्ये केवळ तीन टक्के लोकसंख्या राहते परंतु कोरोना रुग्णांच्या बाबतीत हेच प्रमाण व्यस्त आहे. देशातल्या कोरोना रुग्णसंख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त टक्के रुग्ण केरळमध्ये आहेत. कोरोना विषाणूची पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून विषाणूची लोकांना संक्रमित करण्याची क्षमता वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. सोप्या शब्दात कोरोनाच्या एका विषाणूने एकापेक्षा जास्त माणसांना संक्रमित केलं आहे.
याचा परिणाम म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली झपाट्याने वाढ. हे रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अन्य काही उपाय करणं आवश्यक आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळणाऱ्या लोकांचं प्रमाण दर महिन्याला 10 टक्के एवढं आहे. केरळ राज्यात आतापर्यंत 3.4 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 16,837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भीतीदायक वाटणारे हे आकडे खरी कहाणी उघड करून सांगत नाहीत असं संसर्गतज्ज्ञांचं म्हणणं आहे.