संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना धक्का देणारी महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्यातील वैर आता सर्वश्रुत आहे. दोघेही संधी मिळेल तसे एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळतात. अशातच, संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
यादरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख राऊतांनी केला होता. याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत शिवडी कोर्टाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात आपल्यावर वारंवार बिनबुडाचे आरोप केल्याची तक्रार शिवडी न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश देवूनही संजय राऊत हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात आता कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना मोठा झटका बसणार असल्याचा धमकीवजा इशारा दिला होता. अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यामुळे आता राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. त्यापैकी १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, या वॉरंटनंतर राऊत काय भूमिका घेतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.