संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह
औरंगाबाद, ता 5 डिसें : प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची कोयत्याचे वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादमधल्या लाडगावमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. किशोरी मोटे असं 19 वर्षीय मुलीचं नाव असून तिच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हा आरोपी अल्पवयीन आहे असं समजतं आहे. रविवारी तो लाडगावमध्ये गेला होता त्यावेळी त्याने रागाच्या भरात बहिणीची गळा चिरून हत्या केली.
प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भावानेच सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. तो मूळचा गोयेगाव येथील रहिवासी आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे.
सहा महिन्यापूर्वी 19 वर्षीय किशोरीने पळून पुण्यातील आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते औरंगाबादेतील लाडगाव या परिसरात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच किशोरीचा भाऊ हा लाडगावला आला. त्यानंतर बहिणीला तू पळून प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला. त्यानंतर शाब्दिक वादानंतर राग अनावर झालेल्या भावानेच जवळ असलेल्या कोयत्याने सख्या बहिणीवर सपासप वार केले.
भावाने सख्ख्या बहिणीची हत्या केल्याने परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली असून एकविसाव्या शतकात देखील अशा घटना घडत असल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे.