संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार चार जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात कोनगाव पोलीसांना यश आले असून त्यांच्याकडून कोनगाव हद्दीतील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांसह हैद्राबाद येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
दिनांक २५ फेब्रुवारी रोजी भिवंडी कल्याण रोडवरील पिंपळघर येथील शगुण टेक्स्टाईल मार्केट मधील साडी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील अडीच लाख रुपयांची रोकड घरफोडी केली होती. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार कोनगाव, ठाणे, नालासोपारा, वसई विरार, खालापुर जिल्हा रायगड या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून वाहनांची माहिती गोळा करून तांत्रिक माहीती व गुप्त बातमीदारांमार्फत संशयित आरोपी हुसैन रफिक शेख (वय:३० वर्षे), रशीद रफिक शेख (वय: ३२ वर्षे), दोन्ही राहणार अहमदाबाद हायवे जवळ, चिंचोटी, तालुका वसई, तरबेज दाऊद शेख (वय: ३९ वर्षे) राहणार साकी विहार रॉड, पवई व राफीकुद्दीन झहीरुद्दीन सैय्यद (वय: ३२ वर्षे) राहणार चंद्रानगर, बल्लागुडा, इस्माईलनगर, हैदराबाद, तेलंगणा राज्य यांना अटक करून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोनगाव पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली कार व रोख रक्कम असा ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सोबत याच आरोपींनी ७ फेब्रुवारी रोजी कोनगाव पोलीस स्टेशन हद्दीत हरी ओम स्वीट मार्ट दुकानाचे शटर उचकटून घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.