लातूर, प्रतिनिधी: भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेऊन भारत देशाच्या प्रत्येक थरातील नागरिकांना न्याय देण्याच्या उद्देशाने देशात अनेक कायदे व नियम बनविले जातात परंतु पुढे जाऊन त्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याची अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळत आहेत. हुंडाबळी आणि महिलांवरील घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग करणारी अशीच घटना महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे घडलेली आहे. एक वर्षांपूर्वी स्वतःच्या मानमर्जीने घटस्फोट घेतलेल्या एका मुस्लिम महिलेने आपल्या वडिल्यांच्या मदतीने आकसाने सासरच्या पाच लोकांवर हुंडा मागून शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची खोटी तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीनुसार किनगाव पोलीस ठाण्यात कलम 498A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणाची हकीगत अशी आहे कि, अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील मूळची राहणारी अफसाना अल्ताफ शेख नावाच्या महिलेचे 2018 साली मौजे खडी, तालुका पालम, जिल्हा परभणी या गावातील अल्ताफ शेख नावाच्या तरुणाशी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे नातेवाईक-मित्रमंडीळीच्या साक्षीने लग्न झाले. काही काळ त्यांचा संसार सुखाने चालू असताना त्या दाम्पत्याला एक गोंडस मुलगा जन्माला आला. त्यानंतर हि महिला आपल्या सासरच्या गावी मौजे खडी येथे सासू सैयदा आणि सासरा अजीज शेख यांच्या सोबत राहू लागली. नवरा अल्ताफ याने आपल्या उदरनिर्वाहासाठी मारुती डिजायर गाडी खरेदी करून ती भाड्याने चालवू लागला. गाडी भाड्याने चालवीत असताना त्याला सतत दोन-दोन तीन -तीन दिवस बाहेर गावी जावे लागत असे तर सासू-सासरे दिवसभर आपल्या शेताच्या कामानिमित्ताने शेतातच राहत होते.
अशा वेळी अफसाना नावाची हि महिला घरात लहान मुलासोबत एकटीच राहत असे. असे असताना अफसाना हिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले आणि गेले अनेक दिवसांपासून त्यांचे अनैतिक संबंध चालू होते. दोन-तीन दिवसांनी जेव्हा तिचा नवरा अल्ताफ बाहेरून घरी येत असे तेव्हा ती नवऱ्याशी नीट वागत नव्हती, नवऱ्याकडे जास्त लक्ष देत नव्हती तेव्हा नवऱ्याला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येऊ लागला आणि म्हणून नवऱ्याने तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी त्या अफसाना नावाच्या महिलेला गावातील तरुणासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर अफसाना हिने रागाच्या भरात बोलली कि “तू मला शारीरिक सुख देऊ शकत नाही! मला तुझ्यासोबत राहायचे नाही तू मला घटस्फोट दे” असे सांगितले.
घडलेल्या ह्या सर्व प्रकारानंतर गावात माझी बदनामी झाली म्हणून अल्ताफ हा निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु गावातील काही लोकांनी वेळीच त्याला पकडून त्याची समजूत काढली आणि त्या दोघात समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील अफसाना नावाची ती महिला नवऱ्यासोबत राहायला तयार झाली नाही. एव्हढेच काय तर त्यावेळी तिच्या वडिलांनी देखील तिला घरात घेण्यास नकार दिला होता. “तुम्हाला काय करायचे ते करा! आता ती आमच्यासाठी मेली आहे” असे तिचे वडील त्यावेळी बोलत होते.
काही दिवसानंतर तिने नवऱ्याला सोबत घेऊन जाऊन मुस्लिम धर्मियांचे शरीरयत कोर्ट ‘दारुल कझा’ नांदेड येथे गेली आणि तिथे स्वखुषीने ‘खुलनामा’ लिहून देऊन घटस्फोट घेतला. त्यानंतर नांदेड येथेच कोर्टात जाऊन एक शपथपत्र देखील लिहून दिले आणि त्या शपथपत्रात तिने मान्य केले आहे कि तिचे एका तरुणाशी अनैतिक संबंध जुळले असून तिला नवऱ्यासोबत राहायचे नाही म्हणून ती स्वखुशीने घटस्फोट घेत आहे. तिला तिचा मुलगा जैद हा देखील नको आहे आणि काहीहि पोटगी, नुकसान भरपाई देखील नको आहे. त्याच बरोबर तिला सासरच्या कोणत्याही लोकांवर काही आक्षेप नाहीत किंवा काही तक्रार नाही आणि भविष्यात ती सासरच्या लोकांवर कोणत्याही पोलीस ठाण्यात कलम 498 नुसार किंवा हुंडाबळीची तक्रार करणार नाही असे शपथपत्रात लिहून दिले आहे.
अशी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटस्फोट घेतल्यानंतर काही महिन्यानंतर ह्या महिलेने तिचे वडील मगदूम शेख यांच्या बळजबरीने सांगण्यावरून अहमदपूर येथील महिला तक्रार निवारण केंद्रात जाऊन सासरच्या लोकांविरोधात खोटी तक्रार केली. तेथे सुनावणी झाली असता सासरच्या लोकांनी सदरची संपूर्ण घटना संस्थेच्या लोकांना सांगितली आणि त्या तक्रारदार महिलेने स्वतःच्या मर्जीने घटस्फोट घेतला असल्याची सर्व कागदपत्रं दाखविले. महिला तक्रार निवारण केंद्रातील लोकांनी देखील नवरा-बायको दोघात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा समेट झाला नाही.
त्यानंतर काही महिन्यांनी त्या महिलेचे वडील मगदूम शेख यांनी किनगाव पोलीस ठाण्यात नवरा अल्ताफ शेख, सासू सैयदा शेख, सासरा अजीज शेख, मोठा दीर अहमद शेख आणि नणंद शमीम शेख यांचे विरुद्ध खोटी तक्रार दिली असून त्या तक्रारीत पाच तोळे सोने, चार लाख रुपये रोख आणि संसार उपयोगी वस्तू दिल्याची खोटी माहिती दिली आहे. एव्हढेच नव्हे तर सासरच्या लोकांनी जेसीबी घेण्यासाठी दहा लाख रुपये हुंडा मागितल्याची खोटी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद क्र. 0162/2023 नुसार किनगांव पोलिसांनी सासरच्या पाच लोकांवर कलम 498, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
या प्रकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे लग्नाच्या तब्बल पाच वर्षांनी हुंडा मागितल्याची खोटी तक्रार करण्यात आलेली आहे. तक्रारदार महिलेने आधी स्वतःहून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर जवळपास एक वर्षाने हि तक्रार केली आहे. त्याच बरोबर त्या महिलेची नणंद शमीम शेख हि मुंबईला राहत आहे तिचा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तरी देखील तिला त्रास देण्याच्या उद्देशाने तिचे देखील नाव तक्रारीत टाकले आहे. त्यामुळे त्या महिलेने सासरच्या लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांचे कडून दहा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा उद्देशानेच हि खोटी तक्रार केली असल्याचे बोलले जात आहे. एव्हढेच नव्हे तर किनगाव येथील काही बोगस पत्रकारांना हाताशी धरून तश्या बातम्या करून या प्रकरणात सासरच्या लोकांची खोटी बदनामी करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
याबाबत सासरच्या लोकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला असून याबाबत लवकरच त्या अफसाना शेख, तिचे वडील आणि या प्रकरणात सामील असलेले बोगस पत्रकार यांच्या विरोधात लातूरचे पोलीस अधीक्षक सोबतच राज्याचे मुखमंत्री आणि राज्य मानवी हक्क आयोग यांचेकडे रीतसर तक्रार करून दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
“महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी देशात अनेक प्रभावी नियम व कायदे अमलांत आणले गेले आहेत. काही प्रकरणात महिलांना न्याय मिळावा हा त्यामागचा शुद्ध उद्देश्य असला तरी मात्र आता या कायद्याचा दुरुपयोगच जास्त केला जात असल्याचे दिसत असून अशा प्रकारे कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे” असे निरीक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली आपल्या एका निरीक्षणात नमूद केले आहे. ह्या प्रकरणात देखील महिलेने केलेली तक्रार खोटी निष्पन्न झाल्यावर किनगाव पोलीस अफसाना नावाच्या त्या महिलेवर आणि तिचे वडील मगदूम शेख यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.