संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघातील कळंब येथे न्यायालय स्थापन।करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही मंत्रिमंडळाची बैठक शेवटची असल्याचे सांगण्यात येत असतानाही त्यामध्ये आमदार कैलास पाटील यांच्यासाठी खास बाब म्हणून या प्रश्नाला स्थान देण्यात आले आहे.
गेली दोन दिवस कैलास पाटील पक्षनिष्ठेमुळे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत त्यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचा विषय मंत्रिमंडळाने मंजुर केल्याने निश्चितपणे त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही भेट दिल्याचे बोलले जात आहे. कारण विधी व न्याय खात्याचे मंत्री स्वतः उद्धव ठाकरे असल्याने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्याकडून ही भेट देण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील हे त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रयत्न करत होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आज अखेर न्याय मिळाल्याने आमदार कैलास पाटील देखील आनंदीत झाले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करून त्यासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिल्यामुळे मुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार यावेळी आमदार घाडगे पाटील यांनी मानले.