आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदरकरांसाठी खुश खबर! कोव्हीड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला लवकरच होणार सुरुवात !

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठी महापालिकेची तयारी युध्दपातळीवर सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत महापालिकेसह खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी शिक्षिका यांच्यासह अन्य–कोविड योद्ध्यांचे लसीकरण करणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

पालिका प्रशासनाने सोमवार दि.21/12/2020 रोजी कोरोना लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा व नियोजनासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सिटी टास्क फोर्स सभेचे आयोजन केले होते.

या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, पोलिस उप-आयुक्त वि.एम.सागर, महापालिका उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ, लसीकरण अधिकारी डॉ. अंजली पाटील, हिवताप अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. जळगावकर, वैद्यकीय अधिक्षक, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विविध वैद्यकीय संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, बालविकास प्रकल्प अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, आयएफएम, लायन्स क्लब प्रतिनिधी, एनएसएस कॉडीनेटर रॉयल कॉलेज, एकात्मिक बालविकास प्रकल्प प्रतिनिधी, रोटरी क्लब प्रतिनिधी इ. उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. जळगावकर यांनी कोविड लसीकरणाची कार्यपध्दती व रुपरेषा कशाप्रकारे राहील याबाबतची माहिती दिली. यानंतर महानगरपालिकेतर्फे लसीकरण मोहिम राबविण्यासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण करण्यात आले. कोविड लसीकरण उपक्रमाची यशस्वी अमंलबजावणी करण्याच्या दृष्टीने उपस्थित सदस्यांचा सहभाग कशा प्रकारे असेल याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.

कोविड-19 लसीकरण अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी महानगरपलिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत 21 आरोग्य संस्थामधील 1688 कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील 671 संस्थामधून 4148 कर्मचारी अशाप्रकारे एकूण 5836 कर्मचाऱ्यांची संगणीकृत नोंदणी शासन निर्देशित कोविन ऍ़पमध्ये करण्यात आली आहे. लसीकरणास सुरूवात झाल्यानंतर नोंदणीकृत व्यक्तींच्या मोबाईलवर लसीकरण दिवस आणि स्थळ याचा संदेश प्राप्त होणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी
प्रतीक्षालय, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष असे तीन स्वतंत्र कक्ष असणार आहेत.

प्रत्येक पथकामध्ये 1 व्हॅक्सीनेटर ऑफीसर व 4 व्हॅक्सीनेशन ऑफीसर यांचा समावेश राहील. एका पथकामार्फत 100 व्यक्तींना लस दिली जाईल. या लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण 17 डिसेंबर 2020 रोजी पूर्ण झाले असून आरोग्य केंद्र स्तरावर परिचारिका/औषध निर्माण अधिकारी / प्रसविका /बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी/टीबीएचव्ही/ आशा स्वयंसेविका / अंगणवाडी सेविका इ. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

लसीकरणांनंतरही त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक!

लसीकरण झाल्यानंतर ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करून चालणार नाही आणि पूर्वी प्रमाणे त्रिसूत्री नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. वारंवार हातधुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे. या बैठकीत सर्व संस्थान आवश्यकतेनुसार अपेक्षित मनुष्यबळ, लसीकरणासाठी जागा, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग इ. पूरक बाबी महानगरपालिकेस उपलब्ध करून देणेबाबत आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्यामार्फत सूचित करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कॅव्हिड क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच या लसीकरणाचा लाभ मिळणार असला तरी येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांना देखील कोव्हीड-१९ च्या लसीकरण मोहिमेत सामील करण्यात येणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांकरिता हि बातमी निश्चितच दिलासा देणारी आहे. असे असले तरी सर्व सामान्यांनी देखील त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करायलाच हवे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *