आपलं शहर कोकण महाराष्ट्र

मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची खासदार राजन विचारे यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मागणी

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांच्यासोबत २३ डिसेंबर रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सर्व पक्षीय खासदारांच्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील विकास मुद्द्यांवर चर्चा केली.

त्यामध्ये सर्वप्रथम एम. आर. व्ही. सी. मार्फत बोरवली ते विरार दोन वाढीव लाइन टाकण्याच्या कामाची स्थिती जाणून घेतली असून मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा आराखडा बनविताना खासदार राजन विचारे यांनी मी केलेल्या सूचनांचा समावेश केला आहे का? तसेच या नवीन लाईनमुळे दोन्ही रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळू शकणार आहे का? असा सवाल खासदार राजन विचारे यांनी बैठकीमध्ये घेतला.

त्यावर पश्चिम रेल्वेने खासदार राजन विचारे यांना बोरवली ते विरार दरम्यान पाचव्या व सहाव्या लाईनचे काम एम आर व्ही सी मार्फत हाती घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील बोरवली, दहिसर, मिरा रोड, नायगाव, वसई रोड वरील आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील भाईंदर नालासोपारा व विरार पर्यंतचा आराखडा एम आर व्ही सी मार्फत मान्यतेसाठी पश्चिम रेल्वेस प्राप्त झालेला नाही. प्राप्त झाल्यास मान्यता देऊ असे रेल्वेने कळवले आहे.

तसेच एम आर व्हि सी ने नायगाव व भाईंदर या दोन रेल्वेस्थानकामधील नव्याने होणाऱ्या खाडी पुलाच्या दोन्ही बाजू असेलेल्या मातीच्या चाचणीच्या सर्वेक्षणाच्या निविदा काढण्यात आलेला आहेत. तसेच 11.70 हेक्‍टर जमीन मिळविण्यासाठी पालघर व ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. तसेच हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास चार वर्षे लागणार आहेत असे रेल्वे कडून खासदार राजन विचारे यांना कळवले आहे.

तसेच नव्याने होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे भाईंदर व मीरा रोड या रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मान्यता घेण्यात येईल व त्यानंतर या रेल्वे स्थानकात गाड्यांना थांबा मिळू शकेल असे कळविले आहे. जोधपूर, जयपूर, अजमेर, उदयपूर अहमदाबाद या व इतर राज्यात जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या येताना व जाताना थांबा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहे असे खासदार राजन विचारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

खासदार राजन विचारे यांनी पश्चिम रेल्वेला विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना रेल्वे प्रशासनाकडून या दोन्ही रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकते जिने, लिफ्ट, तिकीट खिडकी, एटीव्हीएम मशीन, रेल्वे स्थानकातील फेऱ्या, शौचालय, सुरक्षेसाठी बसविलेले सी सी टीव्ही यावर भर देऊन वाढविण्यात येतील असे रेल्वे प्रशासनाने कळविले.

पुढील प्रश्नांमध्ये होर्डींग ने मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानके झाकली गेली असून नागरिकांना अडथळा ठरत आहेत ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावी अशी मागणी वारंवार करून सुद्धा रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यावर बाधित ठरणारी सर्व होल्डिंग काढून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली जातील असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

पुढील प्रश्नांमध्ये खासदार राजन विचारे यांनी भाईंदर पश्चिम फाटक रोड येथील भुयारी मार्गाच्या दुरवस्थेबाबत विचारले असता रेल्वे प्रशासनाने या कामाच्या निविदा प्रक्रिया 30 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होऊन महानगरपालिके मार्फत रस्त्याचे काम मार्गी लागेल असे कळविले आहे. तसेच या ठिकाणी नवीन उड्डाणपुलासाठी प्राधिकरणामार्फत आराखडा प्राप्त झाल्यास डिपॉझिट टर्म वर उड्डाणपुलाची निर्मिती करू शकतो असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *