मिरा भाईंदर, प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून ही ‘भारत जोडो’ यात्रा तेलंगाणा मधून ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून देगलूर, नांदेड येथे प्रवेश करणार आहे.
या निमित्ताने मिरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने उत्तन ते डेल्टा गार्डन, मिरारोड अशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, जिल्हा, सेल, ब्लॉकचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काँग्रेसचे जेष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर शहरातील पक्षाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असून त्यांची पहिली तुकडी रेल्वेने नांदेडला रवाना होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी पत्रकारांना दिली आहे.