संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
गेल्या दोन महिन्याचा एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन कालावधी उलटल्यानंतर प्रथमच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे डोंबिवलीत बुधवारी ‘इंजिनिअर्स डे’ दिवशी राज्यस्तरीय उद्योजक परिषदेसाठी येणार आहेत. भारताचे सुपुत्र आणि थोर इंजिनिअर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणून हा दिवस संपूर्ण भारतामध्ये “इंजिनिअर्स डे” म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ कल्याण चॅपटर’ यांच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर २०२२, बुधवार राजी दुपारी तीन वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे “इंजिनिअर्स डे” च्या पूर्व संध्येला राज्यस्तरीय उद्योजक परिषद भरवली जाणार आहे.
‘एकमेका साहाय्य करू ! अवघे होऊ श्रीमंत’ हे या ट्रस्ट चे घोषवाक्य असून “प्रत्येक उद्योजक हा त्याच्या व तिच्या व्यवसायातील एक इंजिनिअर असून प्रत्येक इंजिनिअर ने व्यावसायिक बनले पाहिजे” अशी या परिषदेची थीम असून कल्याण-डोंबिवली तसेच आसनगाव – शहापूर – अंबरनाथ – बदलापूर या परिसरातील सुमारे १००० विविध उद्योजक, फॅक्टरी ओनर्स विविध असोसिएशन या परिषदेमध्ये सहभागी होणार असून उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर इथे चर्चा होऊन उद्योजकांच्या मागण्या परिषदेचे उदघाटक महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे देणार आहेत.
यासंदर्भात ट्रस्टचे पदाधिकारी राकेश चौधरी, संतोष पाटील, विनीत बनसोडे, सुमित पाटील, नितीन बोरसे यांनी डोंबिवली जिमखाना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे उद्योजक बना हा उद्देश समोर ठेवून मराठी उद्योजकांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्यस्तरीय उद्योजक परिषदेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. परिषदेला उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, एमआयडीसी चे सीईओ डॉ. पी.अनबलगन (भाप्रसे), एमएसएमई महाराष्ट्र राज्याचे संचालक पार्लेवार, महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीचे सीईओ डॉ. नामदेवराव भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. “इंजिनीयर डे” अनुषंगाने एका उद्योजकीय प्रदर्शनाचही आयोजनही करण्यात आलेले आहे असे या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले .