संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा पोलीस शिपाई हाच कायद्याचा रक्षक असून भक्षक बनल्याची घटना गुरुवारी दि.१९ ऑगस्ट ला नांदीवली परिसरात घडली आहे. एका पोलीस शिपायाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिपायाची रवानगी कारागृहात झाली आहे. तसेच आरोपी पोलीस शिपयाचे तडकाफडकी निलंबनही करण्यात आले आहे.
डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने तो राहत असलेल्या इमारतीमधील एका अल्पवयीन मुलीशी लगट करून तिचा विनयभंग केल्याची नुकतीच घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात ‘विनयभंग’ आणि ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. सतीश कार्ले (वय ३४ वर्षे), असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
इमारतीच्या जिन्यात पीडितेचा विनयभंग
रामनगर पोलीस ठाण्यात चार वर्षांपासून आरोपी पोलीस शिपाई सतीश कार्ले हा कार्यरत होता. तो कुटूंबासह डोंबिवली जवळील नांदीवली परिसरात एका सोसायटी राहण्यास आहे. गुरुवारी दि. २० ऑगस्टला दुपारच्या सुमारास पीडित मुलगी इमरतीच्या जिन्यातून जात असताना आरोपी पोलीस शिपायाने तिच्याशी लगट करत विनयभंग केला. या घटने नंतर त्याच रात्री पीडित मुलीने त्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. यावरुन पोलिसांनी पोलीस शिपायावर ३५४, ३५४ (अ), पोक्सोचे कलम १० व १२ नुसार मध्यरात्री दोनच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी शिपायाचे तडकाफडकी निलंबन
शुक्रवारी दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी अटक केल्यानंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली होती. पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा शनिवारी दि. २१ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात केली आहे. तर दुसरीकडे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिपाई सतीश कार्ले याला तडकाफडकी निलंबित केले आहे असे रामनगर पोलिसांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.