संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
जेनेटीक लाईफ सायन्सेस परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी..
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुरवठा..
वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झाल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होईल. जेनेटीक लाईफ सायन्सेस अतिशय कमी वेळात भारत सरकारची परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिवीर उत्पादनाला सुरूवात झाली. येथे दररोज ३० हजार व्हायलची निर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अल्पावधीत उत्पादनास परवानगी मिळवून दिली. आज ६ मे रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ‘जेनेटीक लाईफ सायन्सेस’ कंपनीत उत्पादनाची पाहणी करीत आढावा घेतला.
यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते.
गडकरी यांनी यावेळी उत्पादन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, औषध उत्पादन डोळ्यांनी बघायला मिळाले असल्याचे सांगितले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पहिल्यांदा करून महाराष्ट्रातदेखील सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशात इतरही ठिकाणी दिले जाईल. सगळं काही आम्हालाच मिळाले पाहिजे असा आग्रह नाही मात्र वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
इंजेक्शनकरीता अस्वस्थता होती. काही लोकांनी काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला. ती वेळ राहणार नाही. गोरगरीबांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणाले. वर्ध्यात उत्पादन सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पण, जिद्दीने काम केले. देशातील, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी मदत केली. अन्न व औषधी प्रशासन विभागाने मदत केली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, स्वीय सहायक मांडलेकर यांनी परवानगी देण्यात मदत केली. अनेकांचे याकरीता सहकार्य मिळाले. हेट्रो या हैद्राबादच्या मल्टीनॅशनल कंपनीने जेनेटिक लाईफ सायन्सेसला सगळे मानक व प्रयोगशाळेतील उपकरणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. इंजेक्शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा आनंद झाला असेही गडकरी म्हणाले.
वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाही…
वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाही. भिलाईवरून येणारे ट्रक येथे आणण्याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. २० टन सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयाला देण्यात येईल. उर्वरित देवळीला स्टोअर करण्यात येईल. सेवाग्राम आणि सावंगी येथे 20-20 टॅन क्षमतेचे ऑक्सिजनचे प्रकल्प लवकर उभे करण्यासाठी पाठपुरावा करू. सिलेंडरही वाढवू, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. विदर्भात व्हेंटीलेटर वाटलेत. बायपॅप आणि ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पण आलेत. सांगाल तेवढे व्हेंटीलेटर द्यायला तयार आहे फक्त त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. सगळ्यांनी हिमतीने आता प्रतिकार केला पाहिजे. संकट मोठे आहे. परिस्थिती आव्हानात्मक आहे. तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे यावेळच्या अडचणी लक्षात घेऊन आपण पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही माणसाचा मृत्यू ऑक्सिजन, औषधीविना होता काम नये, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असे गडकरी म्हणाले.