संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी
मुंबई: देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती प्रत्येक जण सन्मान, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करीत असतात परंतु देशांतर्गत गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरात जे पोलीस दलाचे जवान आपले प्राण पणाला लावून देशाची सुरक्षा करीत असतात त्यांच्याकडे मात्र फारसे कुणी लक्ष देत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ह्या रक्षा बांधनाच्या सणाला एक वेगळे रूप देऊन साजरे करण्याचा निर्णय एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाने घेतला असून गडचिरोली सारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील पोलीस बांधवांकरिता विद्यापीठा तर्फे 4000 राख्या पाठविण्यात आल्या आहेत.
ऋणानुबंध उपक्रमांतर्गत गडचिरोली पोलिस बांधवांसाठी एस.एन.डी. टी महिला विद्यापीठाच्या मा.कुलगुरू, प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एस.एन. डी. टी महिला विद्यापीठाच्या परिवारातर्फे 4000 राख्या आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी पाठविण्यात आल्या आहेत. ऋणानुबंध ह्या उपक्रमास एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ह्या सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला.
गडचिरोली पोलिसांसोबत रक्षा बंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करून त्यांच्याप्रती एक कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे हा ऋणानुबंध उपक्रमाचा मुख्य हेतू आहे असं मत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच समाजकार्य विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी व्यक्त केले.