Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

एमएमआरडीए व महापालिकेच्या माध्यमातून सुरु होणार 1800 कोटींची सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे?

मिरा-भाईंदरच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आणि या कामात भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल!- आमदार प्रताप सरनाई

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आहेत. एकूण 1800 कोटी रुपयांचा या रस्त्यांवर खर्च होणार आहे. 1400 कोटी एमएमआरडीएच्या माध्यमातून तर 400 कोटी मिरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यांच्या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. एमएमआरडीएने ठेकेदाराला कार्यादेश दिले असून पुढील आठवड्यात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरु होतील. किमान 25 वर्षे हे काँक्रीट रस्ते चांगले राहतील अशा पद्धतीने काम केले जाईल. आता कामाला सुरुवात करून काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील वर्षी मार्च महिन्या पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आज आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीप्रमाणे मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी जवळपास 3 हजार कोटींचा विकास निधी शिंदे सरकारने दिला आहे. हि सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, काही कामांसाठी विविध खात्यांच्या परवानगी आणणे बाकी असून या सर्व कामांबाबत आढावा घेण्यासाठी आज आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त संजय काटकर यांच्यात बैठक पार पडली. जो निधी राज्य सरकारने दिला आहे ती सर्व विकास कामे वेळेत पूर्ण व्हायला हवीत. यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत व निधीचा विनियोग करावा, अशा सूचना आमदार सरनाईक यांनी केल्या.

मिरा-भाईंदर शहराला चांगले दर्जेदार रस्ते देण्याचे वचन आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले होते व या कामासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून याच वर्षी मंजुरीही आणली होती. मिरा-भाईंदरच्या सिमेंट रस्त्यांवर 1800 कोटींचा खर्च होणार आहे. एमएमआरडीए 1400 कोटी खर्च करून रस्ते व ब्रिज बांधणार आहे . तर महापालिका 400 कोटी खर्च करून सिमेंट रस्ते करणार आहे. या कामासाठी ठेकेदारांना कार्यादेश दिले असून पुढील आठवड्यात हे काम सुरु होईल अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील 80 टक्के रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. मार्च महिन्या पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा मानस महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे, असेही ते म्हणाले. हे रस्ते चांगले व दर्जेदार असतील आणि किमान 25 वर्षे टिकतील असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.

सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरु करताना सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी शहरात अंतर्गत जल वाहिनी टाकण्याचे कामही आधी केले जाणार आहे. जेणेकरून पुन्हा खोदकाम होणार नाही. सगळे नियोजन करून सिमेंट रस्त्यांची कामे महापालिकेने सुरु करावीत, अशा सूचनाही आमदारांनी केल्या.

आमदार प्रताप सरनाईक ने केली आयुक्तांशी चर्चा!

आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त यांच्यात शहरातील विकास कामांशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. राज्य सरकार कडून विकास कामे, प्रकल्प यासाठी जो निधी आला आहे, त्यात काही कामात तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या आहेत. विविध परवानगी आणणे व वेळेत कामे पूर्ण करून पुढील एका वर्षात विकास कामांचे लोकार्पण करणे अशा विविध विषयांवर आमदार व आयुक्त यांच्यात चर्चा झाली. आमदार सरनाईक यांनी विकास कामांबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, विविध खात्यांचे अधिकारी यांच्याशीही चर्चा करून आवश्यक परवानग्या मार्गी लावल्या आहेत.

मिरा-भाईंदर शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप यापूर्वी अनेक वेळा करण्यात आले आहेत. भ्रष्टाचारामुळे शहरातील रस्त्यांची कामे निष्कृष्ट दर्जाचे झाले आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे 1800 कोटींच्या सिमेंट काँक्रीटच्या बांधकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करून संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपले खिसे भरणार का? अशी चर्चा केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *