मिरा भाईंदर, प्रतिनिधी: स्वच्छ अमृत महोत्सव अभियान अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनांना अनुसरून दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आली.
“इंडियन स्वच्छता लीग” स्पर्धेमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेस महाराष्ट्रात 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये प्रथम क्रमांकाने मानांकित करून गौरविण्यात करण्यात आले असून त्यामुळे मिरा भाईंदर महानगरपालिकेने मानाचे स्थान पटकावले आहे.
स्वच्छ अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये 1800 शहरांनी भाग घेतला होता. मिरा भाईंदर महानगरपालिकेने “मिरा भाईंदर स्वच्छाग्रही” या नावाने सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. “मिरा भाईंदर स्वच्छाग्रही” टीमचे कप्तान मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली मिरा भाईंदर शहरात 17 सप्टेंबर 2022 रोजी स्वच्छता रॅली, बीच क्लीनअप, किल्ले व उद्यानांची स्वच्छता मोहीम खूप व्यापक स्वरूपात राबवली गेली.
शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, शाळा, कॉलेज, कर्मचारी यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. स्वच्छतेचा संदेश घेऊन असंख्य विद्यार्थ्यांनी श्रमदान करत शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. “मिरा भाईंदर स्वच्छाग्रही” टीमचे कप्तान म्हणून आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शहरात सुरू असलेल्या रॅलीला भेटी दिल्या.
विशेष म्हणजे ही स्वच्छता मोहीम सुरू असताना ठाणे/पालघर जिल्ह्यात सतत पावसाचे थैमान सुरू असूनही आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता लीग रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या स्वच्छता मोहिमेचे खास आकर्षण म्हणजे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व राहुल देव सुद्धा या अभियानात सहभागी झाले होते. अनेक नागरिकांनी या मोहिमेत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याच प्रमाणे जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी समुद्र किनारी वाळूतील शिल्प साकारून एका अनोख्या पद्धतीने जनजागृतीचा संदेश दिला होता.
या सर्व मोहिमेची दखल घेऊन केंद्र शासनाच्या स्वछ भारत मिशन द्वारे मिरा भाईंदर महानगरपालिकेला “इंडीयन स्वच्छता लीग” अंतर्गत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने मानांकित करून महापालिका आणि पर्यायाने आयुक्त दिलीप ढोले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
हा सन्मान फक्त महानगरपालिकेचा नसून सर्व मिरा भाईंदर शहरवासीयांचा आहे असे म्हणत “मिरा भाईंदर स्वच्छाग्रही” टीमचे कप्तान महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पालकमंत्री, खासदार, आमदार, मिरा भाईंदर महानगरपालिका माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू व संपूर्ण शहरवासियांचे आभार व्यक्त केले असून सर्व स्तरातून महापालिका आयुक्त तसेच पालिका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.