Latest News गुन्हे जगत

डोंबिवलीतील “सर्वोदय पार्क सोसायटी” तून बालमजूर कामगाराची सुटका; मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवधूत सावंत, प्रतिनिधी (डोंबिवली) : डोंबिवलीतील नांदीवली पंचनांद येथील “सर्वोदय पार्क सोसायटी” गृहसंकुलातुन ३०० रुपये रोजंदारीवर मजुरीचे काम करणाऱ्या एका १६ वर्षे किशोरवयीन अवस्थेतील बालमजूर कामगाराची सुटका करण्यास राष्ट्रीय पदक विजेते पत्रकार तथा साप्ताहिक “युवा सह्याद्री” चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री. अवधुत सावंत व “सलाम बालक ठाणे सिटी चाईल्डलाईन” च्या समन्वयक सौ.श्रद्धा संतोष नारकर यांना यश आले असून त्याबाबत मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित मुकादम नामे बळवंत तुकाराम कुप्पे (४३ वर्षे), राहणार आजदेगाव, डोंबिवली (पूर्व) याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डोंम्बिवलीतील नांदीवली पंचानंद येथील सर्वोदय पार्क सोसायटीतील “ए / ००३” सदनिकेत “महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पदक विजेते (२००९)” तथा साप्ताहिक “युवा सह्याद्री” चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री.अवधुत मधुकर सावंत (वय ५५ वर्षे) हे आपल्या पत्नी व दोन मुलांसमवेत सन २००२-२००३ पासून वरील संकुलात राहत असून काल दि.१७.०३.२०२१ रोजी दुपारी २.४५ वाजता कामावरून आपल्या घरी जेवण्यासाठी परतले असता त्यांना आपल्या बेडरूम च्या पाठीमागील बाजूस जोरजोरात खोदकाम करत असल्याचा त्यांना आवाज ऐकू आला. आवाज नक्की कुठून येतोय हे पाहण्याकरता म्हणून स्लायडिंग उघडून पाहिले असता एकूण ३ मजूर कामगार तिथे भरदुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गटाराचे खोदकाम करीत असल्याचे त्यांनी पाहिले. सदर ३ कामगारांना त्यांनी टोकले असता व त्यांची नावं व वय विचारले असता त्यांनी त्यांची नावे १). अमर विठ्ठल इचुरे (वय १९ वर्षे), २). वीरेंद्र पटेल (वय २० वर्षे) व त्यातील एक मुलगा हा किशोरवयीन बालमजूर काम करताना आढळून आला म्हणून त्यांनी त्यांच्या मुकादमाला बोलावून आणण्यास सांगितले व त्यांना सुचवले की नियमाप्रमाणे दुपारी २ ते ४ या वेळात काही आजारी वयस्क जेवून त्यांच्या रोज घ्यावयाच्या औषधी गोळ्या घेऊन वामकुक्षी घेतात तर तुम्ही ही थोडा वेळ आराम करून ४ वाजल्या नंतर कामाला सुरुवात करावी असे विनंतीवजा सांगून काम थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कामगार २). वीरेंद्र पटेल (२०) याने सदर काम पाठीमागे बंगल्यात राहणाऱ्या शेट सुभाष म्हात्रे याने आम्हाला करण्यास सांगितले आहे व आम्हाला वेळ काळ ठरवून दिलेली व निश्चित करून दिलेली नाही असे सांगताच पत्रकार अवधुत सावंत यांनी आपलं विझिटिंग कार्ड त्याला देत आधी काम बंद कर आणि तुझ्या त्या शेटला हे माझं कार्ड देऊन भेटायला बोलवं असं सांगताच त्याने निमूटपणे काम बंद केले व ४ वाजून ०६ मिनिटांनी पुन्हा खोदकाम करण्यास सुरू केले. तेवढ्या वेळात पत्रकार
अवधुत सावंत यांनी त्या कामगारांचे काम करतानाचे फोटो व विडिओ काढून चाईल्ड हेल्पलाईन क्र. १०९८ वर कॉल करून तक्रार केली की एक किशोरवयीन बालकामगार सदर सर्वोदय पार्क सोसायटीत काम करत आहे व त्याचे फोटो व विडिओ काढलेला आहे. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वाल्यांनी ती तक्रार ताबडतोब “सलाम बालक ठाणे सिटी चाईल्डलाईन” च्या समन्वयक सौ. श्रद्धा संतोष नारकर यांना वर्ग करून त्यांनी त्वरित हरकत घेत पत्रकार सावंत यांना फोन करून त्यांच्याकडून फोटो व विडिओ मागवून घेऊन ते पाहून झाल्यानंतर पत्रकार अवधुत सावंत यांना पुन्हा फोन करून लगेच मानपाडा पोलीस स्टेशनला फोन करण्यास व तक्रार करण्यास सुचवले. सावंत यांनी मानपाडा पोलिसांना फोन करून तशी तक्रार देऊन बिट मार्शल चा नंबर घेऊन त्यांनासुद्धा फोन करून ताबडतोब बोलवून घेतले. तोवर सौ.श्रद्धा नारकर यांनीही मानपाडा पोलीस ठाण्यात पीएसआय दिनकर सुर्वे यांना सदर बाब समजावून गुन्हा अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ व ७९ खाली गुन्हा मोडत असल्याने तसा तो नोंदवण्यास सुचवले.

बिटमार्शल यांचे घटनास्थळी आगमन

बिटमार्शल भास्कर गायकवाड व ताराचंद सोनवणे हे घटनास्थळी आल्यावर त्यांनी पाहिले की त्या ३ कामगारांनी कोरोनाची नियमावली न पाळता चेहऱ्यावर मास्क ही परिधान केलेले नाहीत आणि त्यातील एक मुलगा किशोरवयीन दिसत असून त्याचं वय विचारून खातरजमा केल्यावर त्या मुलाला बिट मार्शल यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन हजर केले असता पीएसआय सुर्वे यांनी पुढील चौकशी केली असता त्या किशोरवयीन मुलाने बळवंत तुकाराम कुप्पे (वय ४३) राहणार सिताकुंज, बिल्डिंग नं.१, आजदेगाव डोंबिवली (पूर्व) याचे नांव सांगितले म्हणून मानपाडा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध बालकामगार आहे हे माहीत असून सुद्धा त्यास कामावर ठेवुन त्याचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करून त्या किशोरवयीन मुलावर अन्याय केला आहे म्हणून दि.१८.०३.२०२१ रोजी सकाळी ११:३१ वाजता गुन्हा दाखल केला आहे.

सदर किशोरवयीन मुलांस दि.१८.०३.२०२१ रोजी मानपाडा पोलिसांनी उल्हासनगर – ५ येथील चाईल्ड वेल्फेयर कमिटी समोर हजर केले. तेथील (सीडब्लूसी) च्या न्यायाधीश सौ.सुनीता बाबूळकर यांच्या समोर त्या मुलाला हजर केले असता चौकशी अंती त्या मूलाकडून कळले की तो कर्नाटक येथे राहणारा असून ११ वी आर्टस् शाखेत शिक्षण घेत असून इकडे दावडी येथे त्याची मावशी राहते तिच्याकडे सध्या तो राहत आहे. लॉकडाऊन मुळे त्याच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे म्हणून घरच्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून तो काम करत आहे असे सांगितले. सौ.बाबूळकर यांनी त्या मुलाची कस्टडी सलाम बालक ठाणे सिटी चाईल्डलाईन च्या ताब्यात देत त्या मुलाला कर्नाटक येथे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप पणे पोहोचवण्याचे आदेश दिले.

तक्रारदार म्हणून स्वतः पत्रकार अवधुत सावंत चाईल्ड वेल्फेयर कमिटी समोर हजर

पत्रकार अवधुत सावंत यांनी सीडब्लूसी च्या न्यायाधीश सौ.सुनीता बाबूळकर यांना सुचनावजा एक विनंती केली की सदर “सर्वोदय पार्क” ही १२ विंग ची सोसायटी असून त्या मध्ये जवळपास २०० सभासद असून सोसायटीची समिती ह्यांची प्राथमिक जबाबदारी होती की सोसायटीच्या समितीच्या सभासदांपैकी एकाने तरी कामाच्या ठिकाणी स्वतः जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी उभं राहून सध्याच्या कोरोना सारख्या जागतिक भीषण महामारीच्या काळात महापालिकेने लादलेले निर्देश बाहेरचे कामगार संकुलात काम करायला आले आहेत तर ते मास्क परिधान करण्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाही? एखादा बालमजूर तर काम करत नाही ना?

तर समितीने आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे म्हणून त्यांच्यावर ही कायदेशीर फौजदारी कारवाई व्हावी जेणेकरून इतर लापरवाह सोसायट्यांनाही त्याचा तसा वचक बसू शकेल. तर सौ.सुनीता बाबूळकर यांना पत्रकार सावंत यांनी सूचना रास्त वाटली म्हणून श्री.सावंत यांना समितीला तसे लेखी पत्र देण्यास सांगितले व सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीवर फौजदारी कारवाईचे आश्वासन दिले व सलाम बालक ठाणे सिटी चाईल्ड हेल्पलाईन च्या समन्वयक सौ.श्रद्धा नारकर यांना सोसायटीला तसा समन्स बाजावण्याचे निर्देश दिले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *