मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी ठाण्याला जावे लागत होते त्यामध्ये त्यांचा प्रवासाचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होता. घोडबंदर रोड येथे आठवड्यातुन दोन दिवस कॅम्प लावला जात आहे परंतु पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नसल्यामुळे नागरिकांची कामे रखडली जात होती म्हणून मिरा भाईंदर शहरातील नागरिकां करिता कायमस्वरूपी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात होती.
या मागणीचा विचार करून मिरा भाईंदर शहरासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप-केंद्र सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. या केंद्रात प्रादेशिक परिवहन विभागाशी संबंधित असलेली सर्व कामे करण्यात येणार असल्यामुळे आता मिरा भाईंदरच्या नागरिकांना ठाण्याला जाण्याची गरज भासणार नसल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
प्रवर्तन निदेशालाय(ईडी) ने शिवसेनेचे वादग्रस्त आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि सर्व कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले त्यानंतर चौकशीसाठी त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ताब्यात घेतले आणि अभिनेत्री कंगना राणावत हिने प्रताप सरनाईक यांच्या घरात पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडल्याचे वादग्रस्त ट्विट केल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच पत्रकारांना सामोरे जात आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत घडलेल्या सर्व घडामोडींचा खुलासा केला. त्याच वेळी सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरात उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली.
मिरा भाईंदर शहराची स्वतंत्र महानगरपालिका असली तरी हे शहर ठाणे जिल्ह्यात मोडते आणि महसूल विभागाशी संबंधित कामकाज असो, न्यायालयाशी संबंधित कामकाज असो, प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा इतर कोणत्याही शासकीय कामकाजासाठी मिरा भाईंदर च्या नागरिकांना ठाण्यालाच जावे लागते. मात्र मिरा भाईंदर शहर ठाणे शहरापासून २५ किलोमीटर लांब असल्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात आहे. तसेच शहराची लोकसंख्या अंदाजे तेरा लाखाच्या आसपास असल्यामुळे या शहराला स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आठवड्यातील दोन दिवस घोडबंदररोड येथे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शिबीर आयोजित करून हे काम पार पाडण्यात येत होते. मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्या मागणीमुळे या शहरात कायम स्वरूपी ठाणे प्रादेशिक परिवहन उपकेंद्र सुरु करण्याच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार घोडबंदर येथील बस आगाराला लागून असलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात हे सुरु करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वास्तूचा वापर करून कॅम्पुटर आणि कर्मचाऱ्यांची सोय ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फ़त करण्यात येणार आहे. तसेच पुढील आठवड्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फ़त मिरा भाईंदर शहरातील घोडबंदर भागात ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप-केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासाठी देण्यात आलेली ही जागा तात्पुरत्या स्वरूपाची आहे. त्यामुळे येत्या दिवसात पालिका प्रशासनाने आरटीओसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षित भूखंडावरील जागेत इमारतीची निर्मिती करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त विजय राठोड यांच्याकडे केली असल्याची माहिती त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
“दीड हजार नागरिकांचे परवाने प्रलंबित-
मिरा भाईंदर शहरातील नागरीकांना वाहन परवाना मिळवण्याकरिता ठाणे आरटीओ कार्यालयात जावे लागते. मात्र, या केंद्रात कामाचा ताण अधिक असल्यामुळे मिरा भाईंदर शहरातील युवकांचे सुमारे दीड हजार परवाने प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे घोडबंदररोड येथे सुरु होणाऱ्या आरटीओच्या उप-केंद्रामुळे ही अडचण दूर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.